दुधाची पावडर बनविणा- या उत्पादकांना तीन रूपये अनुदान ; दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा !
 
मुंबई :  राज्यातील दुधाची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन त्याचा दुध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी सहकारी व खासगी दुध पावडर बनविणा- या  उत्पादकांना प्रति लिटर दुधामागे तीन रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मार्च 2018 मध्ये उत्पादित केलेल्या दुध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अतिरिक्त दुध भुकटी तयार करणाऱ्यांना आजच्या निर्णयाचा लाभ होणार आहे. शासन निर्णय काढल्याच्या दिनांकापासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीसाठी हा निर्णय लागू असेल.
 
राज्यात सध्या दुधाचे अतिरिक्त उत्पादन झालेले आहे. मात्र, याच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  बाजारात दुध पावडरचे दर घसरलेले आहेत. घसरलेल्या दरांमुळे कमी दुध पावडर  तयार करण्याकडे प्रकल्पधारकांचा कल असतो. तसेच दुधाची पावडर निर्माण करणे परवडत नसल्याने प्रकल्पधारकांकडून कमी दराने दूध खरेदी करण्यात येते. याचा सरळ परिणाम दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यामुळे दुध भुकटी उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन दुध खरेदीस चालना देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून अतिरिक्त उत्पादित दुधाचा विनियोगदेखील त्यामुळे शक्य होणार आहे.   साधारणपणे 100 लिटर दुधाचे रुपांतरण दुध पावडर व लोणी यामध्ये करताना होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्नाचा विचार करता एकूण 324 रुपये 55 पैसे इतका म्हणजेच प्रति लीटर दुधामागे 3 रुपये 24 पैसे इतका तोटा दुध पावडर प्रकल्पधारकांना येतो. राज्यात 31 मार्च 2018 अखेर 26 हजार 506 मे. टन इतका दुधाची पावडर शिल्लक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!