समाजातील वंचितांच्या सन्मानाचा, महाराष्ट्रापुढं नवा आदर्श

कल्याणच्या अनिरुद्ध मेंडकी आणि मानसी जोशीचं धाडसी पाऊल 

केतन बेटावदकर

कल्याण : समाजातील वंचित घटकांना दूर लोटल्याचा अनुभव आपल्याला पावलोपावली येत असतो. मात्र त्यांच्याच शुभहस्ते आपल्या एखाद्या नव्या कार्याची सुरूवात करणे म्हणजे खूप मोठं धाडसच.. हो पण हे धाडस केलयं कल्याणातील अनिरुद्ध मेंडकी आणि मानसी जोशी या दोन नवोदित जिगरबाज व्यावसायिकांनी. कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडजवळील साठेनगर वस्तीतील मुलांच्या हस्ते त्यांनी आपल्या नविन दुकानाचे उद्घाटन केलय. समाजातील वंचितांना सन्मान देऊन या दोन कल्याणकर तरूणांनी महाराष्ट्रापुढं एक नवा आदर्श उभा केलाय.

कल्याणातील नवउद्योजक अनिरुद्ध मेंडकी आणि मानसी जोशी हे व्यवसायाबरोबरच एकमेकांच्या पुढील आयुष्यातीलही भागीदार. सतत नाविन्यतेचा ध्यास आणि तेवढीच समाजभानाचीही जाणीव. आपल्या नव्या व्यवसायाची सुरुवातही त्यांना तितक्याच नाविन्यतेने आणि सामाजिक भान राखून करण्याचा दोघांचाही मानस होता. त्यातून त्यांना कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंड परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वंकष विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘अनुबंध’ सामाजिक संस्थेबाबत माहिती समजली. आणि मग कोणताही अधिक विचार न करता आणि आढेवेढे न घेता डम्पिंग ग्राऊंडच्या साठेनगर वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या हस्ते नविन दुकानाचे उद्घाटन करण्याचे त्यांनी निश्चित केले. या नव्या विचाराला अनुबंध संस्थेच्या प्रमूख प्रा. मीनल सोहनी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. अनुबंध संस्थेच्या माध्यमातून प्रिती राजू ढगे, रवी रतन घुले, प्रभाकर घुले, पवन कृष्णा घुले, अर्चना संजय घुले आणि पायल वाघमारे यांच्या हस्ते नव्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आल. एरव्ही नेहमीच उपेक्षा आणि अहवेलना वाटयाशी येणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आज गगनात मावत नव्हता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर, अनुबंध संस्थेचे विशाल जाधव, विशाल कुंटे, सूर्यकांत कोळी, अनिल मेंडकी, अनिल जोशी, अनिता मेंडकी, अनुराधा जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  ज्याठिकाणाच्या केवळ नावानेच अनेकांची नाकं, तोंड आपसूकच मुरडली जातात. त्याठिकाणी राहणाऱ्या मुलांच्या हस्ते उद्घाटन करणे, त्यांना प्रमूख पाहुणे म्हणून बोलावणे हाच मोठा धाडसी निर्णय. यामध्ये अनिरुद्ध आणि मानसी यांचे संपूर्ण कुटुंबही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. आज एकीकडे समाज एकमेकांपासून कोणत्या न कोणत्या कारणांमुळे दुरावत चालला असताना या नवउद्योजकांनी उचललेले पाऊल नक्कीच अभिमानास्पद आहे. समाजात खोट्या प्रतिष्ठेची झापडं लावून फिरणाऱ्या प्रत्येकाला लावलेली एक सणसणीत चपराक बसल्याची चर्चा कल्याणात रंगली होती.

“वंचितांना पुढे नेण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी”
या अनोख्या संकल्पनेबाबत बोलताना अनिरुद्ध आणि मानसी यांनी सांगितले की, वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची समाजातील घटक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढे जाणाऱ्या व्यक्तीने आपला एक हात मागे राहणाऱ्याला देऊन त्यालाही मुख्य प्रवाहात ओढून घ्यावे. आम्ही त्यादृष्टीने काम सुरू केल्याचेही दोघांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!