सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरू असताना विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तीची हानी होऊ नये, यासाठी दोन्ही मूर्तींना बुलेटफ्रुफ काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात ७३ कोटी ८५ लाख ९५ हजार २२४ रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. हे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. याबाबत कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, विठ्ठलाच्या गर्भगृहातील जीर्णोध्दाराचे काम सुरू आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली चांदीचे आवरण काढण्यात आले. या मंदिरातील गर्भगृह, चौखांबी, सोळखांबी अशा भागातील पुरातन दगडी खांब आणि प्रवेशद्वारावर लावलेली चांदी काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे आजपासून गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. या कामावेळी मूर्तींचे संरक्षण व्हावे आणि त्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये. तसेच ग्रेनाइट काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नये, मूर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे, यासाठी विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या मूर्तीला बुलेटफ्रुफ काचेचे आवरण बसविण्यात आले आहे.