मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (26 फेब्रुवारी) सुरू होत आहे. आज विधानसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता तर विधानपरिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होईल. राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडायला विरोधक आक्रमक झालेत.
मराठा आरक्षण, पोलीस ठाण्यात गोळीबार, लोकप्रतिनिधीची हत्या, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, पुण्यात सापडलेले ड्रग्ज, कांदा निर्यात बंदी, निवासी डॉक्टरांचा संप, यासह विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याचा तयारीत आहेत.
दरम्यान या अधिवेशनात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्नात असून, या पार्श्वभूमीवर मराठा कुणबी समाजाच्या सगेसोयरे व्याख्येच्या अधिसूचनेविषयी सरकार काय निर्णय घेते? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असणार आहे.
एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेराव घालण्याची संधी असेल. तसेच शेतकरी, मराठासह अन्य समाजासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.