मुंबई : होळी सणाच्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये, अन्यथा अनधिकृत वृक्षतोड करणा-यांना दंड तसेच कैदेची शिक्षा होवू शकते. त्यामुळे वृक्षतोड करू नये असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडल्यास हा कलम २१ अन्वये गुन्हा आहे. अनधिकृत वृक्षतोड करणाऱयास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी रुपये १,०००/- पासून रुपये ५,०००/- पर्यंत दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.
अनधिकृत वृक्षतोड करणे हा गुन्हा आहे. ‘होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महानगरपालिका विभाग कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकाऱयांस व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे, असेही महानगरपालिका प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.