मुंबई, दि. १२ः पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन झालेल्या अटलसेतूच्या लोकार्पण कार्यक्रमाचे वेळेवर निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरून संतापलेल्या शिवसेनेच्या (ठाकरे) लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला.
मुंबई – नवी मुंबईला अवघ्या २० मिनिटांत जोडणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शिवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नवी मुंबईतील विविध कार्यक्रमाचे देखील यावेळी लोकापर्ण करण्यात आले. सरकारच्या स्थानिक कार्यक्रमात आमदार, खासदारांची नावे असणे आवश्यक असते. परंतु, शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार, आमदार आणि विरोधी पक्ष नेत्यांची नावे या निमंत्रण पत्रिकेतून वगळली. जाणीवपूर्वक विरोधकांच्या लोकप्रतिनिधींना डावलले, असा आरोप सेनेच्या लोकप्रतिनिधींनी करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच सरकारच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली.
काम पूर्ण होऊन ही उद्घाटन लांबवले
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या सागरी सेतूच्या कामाला गती मिळाली. या सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अटल सेतू असे नाव दिले. मार्गाचे काम पुर्ण झाले असताना, पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम करण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने उद्घाटन लांबवले असा आरोप, शिवसेनेने (ठाकरे) केला.
शिंदे फडणवीसांवर संजय राऊतांची टीका
बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखे जगायला शिकवले. बाळासाहेब वाघ होते, शिंदे गट, फडणवीस महाराष्ट्राला लागलेला डाग आहे, असा चिमटा काढला. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात हजारो शिवसैनिकांवर दाखल केलेल्या आरोप पत्राचा दाखला देत, भाजपवर सडकून टीका केली.
राम मंदिरावरून किती काळ राजकारण करणार आता कुठेतरी त्याला पूर्णविराम मिळायला हवा, असा खोचक टोला शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. कारसेवकांच्या रक्तातून, त्यागातून आणि बलिदानातून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून राम मंदिर उभे राहत आहे. परंतु, भाजपला याचा विसर पडला असून केवळ एकाच व्यक्तीमुळे मंदिर उभे राहत असे भासवून त्यांना हवे ते आणि तसे करून घेत आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केला.
पंतप्रधानांनी उद्धटनाला वेळ दिला, याचा अर्थ कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील. अपूर्ण राम मंदिराचे त्यामुळे निवडणूक पाहून उद्घाटन होत आहे. आपल्या ४ पीठाच्या प्रमुख शंकराचार्यांनी या अपूर्ण मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी समजणाऱ्या या प्रमुख नेत्यांनी याचा विचार करायला हवा. राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे त्यावर टीकाटीप्पणी करणे योग्य नाही. मात्र, भाजपला सध्या देशातील सर्वात मोठे शंकराचार्य हे नरेंद्र मोदी असल्याचे वाटते. प्रमुख शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकेला भाजपाने फार किंमत दिलेली नाही, असे राऊत म्हणाले.
नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी जाऊन केलेल्या आरतीवरून राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. २२ तारखेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काळाराम मंदिरात जाण्याची घोषणा केल्यानंतर भाजपाला या मंदिराची आठवण झाल्याचा टोला लगावला. ठाकरे मणिपूरच्या राम मंदिरात जाणार असून पंतप्रधानांनी मणिपूरला यावे, असेही त्यांनी म्हटले.