डोंबिवली : केडीएमसी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत मतदार याद्या फुगवण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी बोगस आधारकार्डाचा वापर केल्याची तक्रार ज्येष्ठ माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी गैरमार्गांचा आधार घेत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.    या संदर्भात म्हात्रे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, सहाय्यक निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे एका तक्रार वजा निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

 गेल्या अनेक वर्षाचा अनुभव पाहिला तर काही राजकीय पक्षांच्या दबावाखाली अधिकारी, कर्मचारी याद्या फोडताना जाणुनबुजून घोळ करतात. आरक्षणात आपला वॉर्ड बदली झाल्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या वॉर्डातील 3 ते 4 हजार मते ज्या वॉर्डात उभे रहायचे त्या वॉर्डात वर्ग करतात असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.  मतदानाकरिता आधारकार्ड बरोबरच अतिरिक्त पुरावा दिल्याशिवाय, तसेच त्याचा यादीत फोटो आहे की नाही याची खातरजमा केल्याशिवाय अशा मतदाराला मतदानास परवानगी देण्यात येऊ नये. आधारकार्डाची खात्री करण्याचे शासनाचे कुठले सॉफ्टवेअर असल्यास ते प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करुन द्यावे. जेणेकरुन बोगस आधारकार्डाच्या आधारे मतदान होणार नाही. आदर्श आचारसंहिता व कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि बोगस आधारकार्ड सापडल्यास त्या व्यक्तीलाही अटक करावी. तसेच राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशीही मागणी वामन म्हात्रे यांनी त्यांच्या पत्रातून केली आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *