मुंबईत 3 बोगस डॉक्टरांना अटक : युवकाच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश
घाटकोपर ( निलेश मोरे ) : .कुठलीही पदवी नाही अथवा कुठलेही वैद्यकीय शिक्षण नसतानाही केवळ दुसऱ्या व्यक्तीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्वतःच्या नावाचे लेबल चिकटवून दवाखाने चालवणाऱ्या बोगस डॉक्टरांना चेंबूर पोलिसांनी गजाआड केले . जहीर बशीर अहमद शेख ( 36 ) फरमनअली जाहिद हुसेन बेग ( 36 ) आसिफ हुसेन वली अहमद शेख ( 47 ) असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.
दिनांक ८ नोव्हेबरं २०१७ रोजी देवनार येथे प्रदिप आनंदा जाधव ( 25 ) या युवकाचा चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे मृत्यू झाला होता . या प्रकरणी जाधव कुटुंबाच्या नातेवाईकांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता देवनार पोलिसांनी केलेल्या चौकशीत युवकांनी उपचार केलेल्या संबंधित डॉक्टरकडे कोणतेही पदवी शिक्षण आणि वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे आढळले. त्या बोगस डॉक्टर विरोधात महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी आधीनियम 1961 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गंभीर घटनेच्या आधारे परिसरात अजूनही बोगस डॉक्टर असावेत या उद्देशाने पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार चेंबूर परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त शाहजी उमप यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर नेहरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पाटील व सुभाष राठोड . टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर धायगुडे व अमोल आंबवणे यांच्या टीम ने बोगस डॉक्टरांचा सुगावा लावला. एका रुग्णाला बोगस डॉक्टरांकडे पाठवून त्यांच्या बोगसगिरीचा पर्दाफाश केला.
कोण आहेत बोगस डॉक्टर
जहीर बशीर अहमद शेख ( 36 ) हा 12 वी पास असून कुर्ला पूर्व येथील बडी मस्जिदच्या बाजूला स.गो.बर्वे मार्गावर कृपाशंकर रामनरेश मिश्र ( बी एम एस ) यांचे नावे असलेल्या प्रमाणपत्रावर क्रान्ति आयुर्वेदिक दवाखाना चालवत असे . फरमनअली जाहिद हुसेन बेग ( 36 ) हा 11 वी पास असून चेंबूर येथील आचार्य मार्ग येथील शॉप नंबर 133 येथे डॉ ए अन्सारी ( बी यु एम एस , मुंबई ) यांच्या नावे असलेल्या प्रमाणपत्रावर दवाखाना चालवत असे , आसिफ हुसेन वली अहमद शेख ( 47 ) हा 8 वी पास असून चेंबूर फाटक अमर महल येथे डॉ अर्शद ए जाफरी ( बी एस सी , एम ए , बी एच एम एस ) यांच्या नावे असलेल्या प्रमाणपत्रावर दवाखाना चालवत असे . अटक करण्यात आलेले डॉक्टर हे गेली 15 वर्ष या प्रमाणपत्रावर प्रॅक्टिस करत असल्याच्या माहितीच्या निर्दशनात पोलिसांनी आढळून आले . अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांवर भादंवि कलम 419 , 420 गुन्हा 33 , 36 मेडिकल प्रॅक्टिस अक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह ?
मुंबईत बोगस डॉक्टरांचे प्रमाण कमी नाही . कुठलीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता मुंबईतील विविध झोपडंपट्यामध्ये शेकडो बोगस डॉक्टरांनी दुसऱ्याच्या नावे असलेल्या प्रमाणपत्रावर बनावट पदवीच्या आधारे आपली दुकाने थाटली आहेत. 2015 साली मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 95 बोगस डॉक्टर आढळून आले होते . तदनंतर सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे बोगस डॉक्टरांना आळा बसावा यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यातर्फे वेळोवेळी सर्वेक्षण करण्यात येते या सर्वेक्षणात अनधिकृत व्यावसायिकांची शैक्षणिक पदवी , नोंदणी प्रमाणपत्र तपासण्यात येते . या प्रमाणपत्रांमध्ये काही शंका असल्यास ते वैद्यकीय परिषदेकडे पाठवण्यात येते वा खोटी आढळ्यास पूर्ण माहितीसह संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येते हा कायदा वा नियम असताना देखील कायद्याचे हे नियम धाब्यावर बसवून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढतच आहे. मात्र वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे सर्वेक्षणात त्रुटी दिसून येतेय .