हे आहेत तीन पुरस्कार ..
‘बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट‘
याबाबत माहिती देताना उपायुक्त रमेश बांबळे यांनी सांगीतले की, ‘बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट‘ या गटात सर्वेात्कृष्ट कार्याचा पुरस्कार हा बृहन्मुंबई महापालिकेच्या गुंदवली ते भांडूप संकुल दरम्यानच्या जलबोगद्यासाठी देण्यात आला आहे. भिवंडी तालुक्यातील गुंदवली पासून सुरु होणारा हा जलबोगदा कापूरबावडीमार्गे भांडूप संकुलापर्यंत पाण्याचे वहन करण्यासाठी बांधण्यात आला.१५.१० किमी लांबीचा, ६.२५ मीटर व्यासाचा हा जलबोगदा जमिनीखाली १२० मीटरवर असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ६ वर्षात बांधण्यात आला आहे. मुंबईकरांची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उभारणी करण्यात आलेल्या या जलबोगद्याचे लोकार्पण १ डिसेंबर २०१६ रोजी करण्यात आलीय.
‘वॉटर रियुज प्रोजेक्ट ऑफ द इयर‘
दुसरा पुरस्कार हा ‘वॉटर रियुज प्रोजेक्ट ऑफ द इयर‘ या गटातील असून हा ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे बृहन्मुंबई महापालिकेने उभारलेल्या पाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. भातसा धरणातून मुंबईला दररोज २२० कोटी लीटर (2200 MLD) पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्यावर पांजरापूर येथील जल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाते. या प्रकियेदरम्यान दररोज साधारणपणे ४.५ ते ६ कोटी (45 to 60 MLD) लीटर एवढे पाणी (Waste-water) बाहेर टाकले जात असे. याच पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करुन ते पाणी परत वापरण्यायोग्य करण्यासाठी प्रकल्प उभारल्याने या वाया जाणा–या पाण्याचाही वापर करणे शक्य झाले आहे. याच प्रकल्पाची नोंद या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आलीय.
बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट‘
तर तिसरा पुरस्कार हा ‘बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट‘ या गटात भांडूप येथील ९० कोटी (900 MLD) लीटर क्षमतेच्या जल प्रक्रिया केंद्राला देण्यात आला. या जलप्रक्रिया केंदात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जल शुद्धीकरण केले जाते. तसेच प्रक्रिया केंद्रातून बाहेर टाकले जाणारे पाणी देखील पुन्हा–पुन्हा प्रक्रिया करुन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. यानुसार ‘वॉटर डायजेस्ट‘च्या तीन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांच्या माध्यमातून महापालिकेच्या पाणी पुरवठा विषयक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलाय.