मुंबईत महापालिकेच्या नवीन १२ शाळा
मुंबई : मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या १२ महापालिकेच्या शाळा बांधण्यात येणार आहे. त्यापैकी ४ भूखंडांवर शाळांचे बांधकाम करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. एकूण २८ हजार ४५२ चौरस मीटर आकाराचा हा भूखंड असून या जागांच्या विकासासाठी एकूण २६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात करण्यात आली आहे अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.
शिक्षण विषयक असणारी जी आरक्षणे १९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यात आहेत आणि ती जशीच्या तशी २०३४ च्या प्रारुप विकास आराखड्यात देखील दर्शविण्यात आली आहेत; त्याचबरोबर सदर आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात असून मोकळी आहे, याशिवाय ज्या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत, अशी आरक्षणे विकसित करण्यासाठी महापालिकेने अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेतला आहे. मनपा शाळांसाठी आरक्षित असलेले पालिकेचे १० भूखंड, तर पालिकेच्या ताब्यात असलेले इतर २ भूखंड; अशा एकूण १२ भूखंडांवर मनपा शाळा बांधण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. ‘प्रारुप विकास आराखडा २०३४’ साठी महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे. हा २० वर्षांचा आराखडा ४ पंचवार्षिक टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. तसेच प्रत्येक पंचवार्षिक टप्पा देखील पुन्हा वार्षिक टप्प्यामध्ये विभागण्यात आला आहे. याप्रमाणे विकास नियोजन आराखड्यानुसार प्रत्येक वर्षी अंमलबजावणीसाठी हाती घ्यावयाच्या नवीन कामांसाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याचअंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे . सध्या महापालिकेच्या१ हजार ४८ प्राथमिक शाळा असून त्यात २ लाख ८७ हजार ९७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महापालिकेच्याच १४७ माध्यमिक शाळामंध्ये ३५ हजार ९२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त महापालिकेच्या ४२२ अनुदानित शाळांमधून १ लाख ३८ हजार ४४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यानुसार एकूण १ हजार ६१७ शाळांमधून ४ लाख ६२ हजार ३४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महापालिका क्षेत्रातील ६९३ खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये ३ लाख २५ हजार ४२१ विद्यार्थी आहेत.
कुठे बांधणार शाळा
कुलाबा, वडाळा पूर्व विलेपार्ले मजास मालवणी एकसर बोरीवली, कांदिवली कांदिवली पश्चिम तुंगवा मारवली मानखुर्द हरियाली या १२ भूखंडांचा समावेश आहे.