मुंबई महापालिकेत अवतरला ‘पुष्प मयूर’ 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक वास्तू यंदा सव्वाशे वर्षे पूर्ण करीत असल्याने आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी राष्ट्रीय पक्षी असणारा लहान थोरांचा लाडका मोर अवतरला. मोराला पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी सगळयांनीच गर्दी केली होती.
महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी व त्यांच्या टीमने विविध बगीच्यांमधील आकर्षक फुले, झाडांच्या तुटलेल्या फांद्या जमा करुन फुलांचा वापर करुन पुर्णाकृती ‘पुष्प मयूर’ साकारलाय. ‘पर्यावरण वाचवा आणि पर्यावरण वाढवा’ असा संदेश घेऊन आलेल्या या मोरासह महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलांनी साकारलेला शुभ दीपावलीचा फलकही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा मोर तयार करण्यासाठी विविध रंगी ऑर्कीड, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, शेवंती, शोभेची फुले व पाने यासारख्या महापालिकेच्याच उद्यानांमधील फुलांचा वापर करण्यात आला आहे. तर मोराचा पिसारा तयार करण्यासाठी उद्यानातील निर्माण होणा-या कच-यातील झाडाच्या काड्यांचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. या पुष्प मयूरच्या निमित्ताने ‘मोर’ आणि ‘पर्यावरण’ हे महापालिकेच्या ‘कॉरिडॉर’ मधील चर्चेचा विषय ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!