इमारतीच्या गच्चीपर्यंत ‘लिफ्ट’ नेण्याचा बीएमसीचा निर्णय
आयुक्तांची मंजुरी : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना दिलासा
मुंबई : ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सहजपणे इमारतीच्या गच्चीवर जाता यावे या हेतूने मुंबई महापालिकेने इमारतीच्या गच्चीपर्यंत ‘लिफ्ट’ नेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या विकास नियोजन विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या धोरणास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज मंजुरी दिली.
महापालिकेच्या नियमांनुसार इमारतीच्या गच्चीपर्यंत ‘लिफ्ट’ नेण्याची तरतूद नाहीय. गच्चीपर्यंत ‘लिफ्ट’ ची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना त्याचा त्रास सहन करावा लागत होता इमारतीच्या गच्चीपर्यंत ‘लिफ्ट’ ची सोय व्हावी अशी मागणीही वेळोवेळी त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसारच नियमांमध्ये सुधारणा करण्याचे च धोरण तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी विकास नियोजन खात्यास देण्यात आले होते. त्यानुसारच हा प्रस्ताव करून त्याला मंजुरी देण्यात आली. मात्र गच्चीपर्यंत ‘लिफ्ट’ नेण्यासाठी आवश्यक प्रमियम महापालिकेकडे भरावा लागणार आहे. तसेच जुन्या इमारतीच्या गच्चीपर्यंत ‘लिफ्ट’ नेण्यासाठी इमारतीची संरचनात्मक सुयोग्यतेची तपासणी करणे बंधनकारक असणार आहे. विमान वाहतूकीमुळे इमारतींच्या उंचीवर बंधने असणा-या भागात संबंधित नियमांनुसार कार्यवाही होईल असेही धोरणात स्पष्ट करण्यात आलय.