मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.
बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते. अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
..
तुळशी तलावाबाबत संक्षिप्त माहिती
√ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
√ या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.
√ या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
√ या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.
√ तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. (८०४६ दशलक्ष लीटर)