शिवसेना आणि मनसे दोघेही कायदेशीर योग्यच : महापालिका कायदेतज्ञांचे मत ;  गटनेत्याविषयी कायद्यात संदीग्धता 
मुंबई (संतोष गायकवाड)  : मनसेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला प्रवेश आणि एक सदस्य असताना मनसेने गटनेतापदासाठी दाखवलेला हक्क या दोन्ही बाजू कायदेशीररित्या योग्य असल्याचे मत  महापालिका कायदेतज्ञ  चंदकांत माने यांनी  सिटीझन जर्नलिस्टशी बोलताना मांडल आहे. मात्र गटनेत्याविषयी कायद्यात संदीग्धता असल्याचेही कायदेतज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे तत्कालीन परिस्थतीनुसार घेतलेला निर्णय हा कायद्याला धरून असतो असे ही त्यांनी स्पष्ट केलय.
मनसेतील सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. नगरसेवकांच्या प्रवेशामागे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार मनसेने केलीय. कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्यापासून रोखावे तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणीही मनसेने केली आहे. कोकण आयुक्तांनी सहाही नगरसेवकांना सुनावणीसाठी पत्र पाठविले असून सोमवारी ते त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. दरम्यान  मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना गटनेते म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र शुक्रवारी राज ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला पाठवले आहे. एक सदस्य गटनेता होऊ शकतो की नाही याविषयी खल सुरू झाला आहे. मात्र पक्षाचा एक सदस्यही गटनेता होऊ शकतो असेही माने यांचे  स्पष्ट केलय. मनसेच्या गटनेतेपदाचे पत्र हे चिटणीस विभागाकडून प्रथा परंपरेनुसार महापौरांकडे ठेवले जाऊ शकते. मात्र शिवसेनेचे महापौर असल्याने राजकीयदृष्टया हे पत्र वाचतील का ? असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होतोय. जर भाजप मनसेला मदत करणार असेल तर मनसे राज्य सरकारकडे दाद मागू शकते. अन्यथा कोर्टात धाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
—————

 काय आहे कायदेतज्ञांचे मत 

१ कायद्यात फूट हा शब्द वापरत नाही. एखाद्या गटात दुस-या गटात सामील होणे असा शब्द आहे. एका पक्षातून किंवा गटातून दोन तृतीअंश सदस्य दुस-या पक्षात आणि गटात विलीनीकरणाचे जाहरी केल्यास आणि त्या पक्षातील प्रमुखांनी त्यांना घेण्यास इच्छूक असल्यास ते सदस्य कायदेशीर पात्र ठरतात. मनसेचे ९० टक्के सदस्य दुस-या पक्षात विलीन झाल्याने कायदेशीरदृष्टया योग्य ठरले आहेत.

२ एक जरी सदस्य असला तरी गटनेता होऊ शकतो. गटनेतेपदासाठी किती सदस्य संख्या असावी याचा कायद्यात उल्लेख नाही. त्याला मान्यता द्यावी किंवा देऊ नये यांच्याबद्दल काहीही स्पष्ट उल्लेख नाही. यामध्ये संदीग्धता आहे. एक सदस्य असेल तर त्याला गटनेता होता येते किंवा होता येणार नाही, याबाबत काहीही मार्गदर्शन नाही. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये जो काय निर्णय घेतला जाईल तो निर्णय कायद्याला धरून दिला जाईल.

३ महापौरांना फक्त विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेते या दोनच पदांची घोषणा करण्याचा अधिकार  आहे. पण त्यांना वैधानिक दर्जा नाही.  कायद्यात स्पष्ट  म्हणटल आहे की,  विरोधी पक्षनेता आणि सभागृहनेता याला महापौर मान्यता देईल असा. गटनेत्याचे पत्र महापौर वाचतात ही एक पध्दत असून ती प्रथा परंपरेत मोडते. मात्र महापौरांनी त्याला मान्यता दिलीच पाहिजे असा कायद्यात काहिही नाही. याविषयी कायद्यात संदिग्धता आहे.

४. प्रशासनाकडून आलेला विषय महापौरांनी पटलावर घेतला नाही तर तो मंजूर झाला असता समजण्यात येतो. कायद्यात तरतूद आहे. जर एखादे पत्र महापौरांनी पटलावर ठेवल नाही तर तो पक्ष शासनाकडे जाऊ शकतो.
——
कोकण आयुक्तांचा रोल ? 
कोकण आयुक्तांचा रोल हा पहिल्या महिन्यापुरता असतो. कायद्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर त्यांना  कुठल्याही गटाला कुठल्याही गटात सामील होण्यासाठी एक महिन्याची मुदत दिलेली असते, त्या  मुदतीच्या काळात एखादे गट एकमेकांमध्ये सामील होत असतात. त्या गटांना मान्यता देण्याचा अधिकार हा कोकण आयुक्तांकडे आहे. मुंबईतील घडामोडींबाबत केाकण आयुक्तांचा फारसा रोल येत नाही असेही कायदेतज्ञांचे म्हणणे आहे.
——————

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!