मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३’ या स्पर्धेत लोअर परेल येथील पंचगंगा सार्वजनिक मंडळाने प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला. माझगावच्या ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि परळ येथील महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) मोहोर उमटवली.

यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार काजूवाडी येथील श्री गणेश क्रीडा मंडळास तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक प्रभाकर मुळये (विकास मंडळ साईविहार, भांडूप) यांना तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक श्री. प्रदीप पंडित (पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) यांना जाहीर करण्यात आले. याशिवाय, १४ मंडळांना विशेष प्रशस्तीपत्रकही जाहीर करण्यात आले. आज (दिनांक २६ सप्टेंबर, २०२३) महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उप आयुक्‍त (परिमंडळ २) तथा गणेशोत्‍सव समन्‍वयक श्री. रमाकांत बिरादार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे ३४ वे वर्ष असून या स्पर्धेत ६१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरींमध्ये ही स्पर्धा पार पडली. मूर्तीची सुबकता, आरास (देखावा), विषयाची मांडणी, समाज प्रबोधन, वातावरण निर्मिती, पर्यावरण रक्षण, सामाजिक कार्य, नागरी सेवाविषयक उपक्रम आदी बाबींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. दि. २१ आणि २२ सप्टेंबर २०२३ रोजी प्राथमिक फेरी पार पडली. तर, दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटेपर्यंत परिक्षक मंडळाने अंतिम फेरीतील सर्व १४ गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. त्यानंतर श्रीगणेश गौरव स्पर्धेचा अंतिम निकाल बंद पाकिटात व स्वाक्षरीसह महानगरपालिका प्रशासनाकडे सादर केला. त्यानुसार उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादर यांनी या स्‍पर्धेचा निकाल आज जाहीर केला आहे.

अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या १४ गणेशोत्सव मंडळांनी विविध विषयांवर देखावा, चलचित्र आदींचे प्रदर्शन केले होते. प्रथम पुरस्कार पटकाविणाऱया लोअर परळ येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ या संकल्पनेवर आधारित प्रतिकात्मक देखाव्यातून अन्न नासाडी आणि भुकेलेल्यांना अन्न तसेच पारंपरिक अन्नपद्धती याबाबत जनजागृती केली. तर, द्वितीय स्थानी असलेल्या माझगाव येथील ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामान्य कार्यकर्त्यांची विविध रुपे आणि त्यांच्या कार्याचा चलचित्रात्मक देखावा सादर केला. तृतीय स्थानी असलेल्या परळ येथील महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिवरायांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित देखावा सादर केला आहे.

या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे सेवानिवृत्त प्रा. नितीन केणी, पाटकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. आनंद पेठे, जे. के. ऍकेडमी ऑफ आर्ट ऍण्ड डिझाईनचे प्रा. श्री. नितीन किटुकले, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सदस्य विकास माने, पत्रकार श्री. मारुती मोरे, मनपा कला शिक्षण विभागाचे कला प्राचार्य दिनकर पवार, कला विभागाचे प्रतिनिधी अजीत पाटील, दीपक चौधरी, गणेश गोसावी या ९ तज्ज्ञांनी सहभागी मंडळांचे परीक्षण केले.

‘श्रीगणेश गौरव स्पर्धा – २०२३’ चा सविस्तर निकाल

  • प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व)

  • द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग पटांगण, माझगाव, मुंबई

  • तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गं. द. आंबेकर मार्ग, महादेवाची वाडी, परळ, मुंबई

  • सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

श्री. प्रभाकर मुळये (विकास मंडळ (साईविहार) भांडूप पश्चिम)

  • सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावटकार) (रु.२०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

श्री. प्रदीप पंडित (पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राणीबागचा राजा)

  • दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

१. बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बर्वेनगर, घाटकोपर (पश्चिम)

२. गोकुळनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गोकुळनगर, रावळपाडा, दहिसर (पूर्व)

  • शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिक (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

श्री गणेश क्रीडा मंडळ, जाधव चाळ, काजूवाडी, अंधेरी (पूर्व)

  • प्‍लास्‍टिक बंदी / थर्माकोल बंदी / पर्यावरण विषयक जनजागृती उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः

(प्रत्येकी रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

१. बालमित्र कलामंडळ (विक्रोळीचा मोरया), विक्रोळी (पश्चिम)

२. स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सात बंगला, अंधेरी (पश्चिम)

  • सामाजिक कार्य / समाज कार्य / अवयवदान जागृतीः पारितोषिक (रु.१५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

विघ्नहर्ता रहिवाशी मित्रमंडळ, चंपाभूवन, बोरीवली (पूर्व)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!