मुंबई : पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यू आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष शोध मोहीम राबविली आहे. या शोध मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख ६ हजार ८९८ डेंगी आणि मलेरिया डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. नागरिकांनीदेखील त्यांच्या स्तरावर घरात आणि सोसायटी परिसरात नियमित पाहणी करावी, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९४ हजार ९९७ डेंगीच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. यासाठी १ कोटी २७ लाख ५ हजार ३८६ घरांना भेटी देऊन तेथील १ कोटी ९९ लाख ७ हजार ८२२ केंटनरची तपासणी केली आहे. तपासणी मोहिमेदम्यान अनेक घरांना २ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या जातात. अशा १ कोटी २७ लाख ५ हजार ३८६ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच मागील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये ८३ लाख ९४ हजार ५३० घरांना भेटी देऊन ८९ लाख ६६ हजार २४० कंटेनरची तपासणी केली होती. यामध्ये ५३ हजार ४९६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती. त्याबरोबरच २०२१ मध्ये ८१ लाख ६६ हजार १३ घरांना भेटी देऊन ८६ लाख ९४ हजार ७९६ कंटेनरची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान आढळून आलेली ४६ हजार २५९ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती.
या मोहिमेअंतर्गत जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ हजार ७०१ मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. यासाठी २० लाख ३ हजार २७४ घरांना भेटी देऊन ५ लाख ९६ हजार ३९१ कंटेनरची तपासणी करण्यात आली. तसेच २०२२ मध्ये ३० हजार ९२ घरांना भेटी देऊन ३ लाख ९२ हजार ६० कंटेनरची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ८ हजार १९५ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती. तर २०२१ मध्ये ३७ हजार ६१४ घरांना भेटी देऊन २ लाख ४७७ कंटेनरची तपासणी केली होती. यामध्ये ८ हजार ८५६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती.
झोपडपट्टी आणि इतर क्षेत्रात डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरणारे जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू हटवण्यासाठी संयुक्त कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात यावा. नागरिकांनीदेखील महानगरपालिकेच्या सुचनांनुसार आपल्या घरातील आणि घराचा परिसर स्वच्छ ठेऊन या आजाराचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घेणे अपेक्षित आहे.