महिला सफाई कर्मचारी आत्महत्या प्रकरण : मृतदेह आणून बीएमसी मुख्यालयावर मोर्चा
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचारी सुमती देवेंद्र यांना कामावरून काढून टाकल्याने त्यांनी मानसिक तणाखाली येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरोप करीत कचरा वाहतूक संघाने आज तिचा मृतदेह बीएमसी मुख्यालयाबाहेर आणून आंदोलन छेडलं. सुमती यांना अकरा वर्षाची मुलगी आहे
सुमती या परित्यक्ता महिलेने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली हेाती. कोणतंही कारण नसताना महापालिकेने या महिलेला कामावरून काढून टाकलं होतं तसेच थकीत पैसेही देण्यास टाळाटाळ दर्शविली होती त्यामुळे मानसिक तणाखाली आत्महत्या केल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी तिचा मृतदेह घेऊन बीएमसीवर आंदोलन केलं. मृतदेहाला जमिनीवर ठेवून त्यांनी घोषणाबाजी दिली. कंत्राटी सफाई कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही त्यांना घेतले जात नाही. तुटपुंज्या वेतनावरच त्यांना काम करावे लागते. त्यामुळे त्यांना कुटूंब चालविणे जिकरीचे जाते. तसेच कर्जाचा बोजाही डोक्यावर वाढतो. असे अवस्थेत काम नाकारल्याने त्यांना नैराश्य येते. सुमती यांना काम नाकारल्यानेच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सुमती यांचे किमान वेतनाचे एक लाख रूपये देण्यास पालिकेने टाळाटाळ केली त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या आहे त्यामुळे अधिका- यांवर गुन्हा दाखल करून सुमती यांच्या वारसाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे प्रमुख मिलिंद रानडे यांनी केलीय.