खुशखबर ! मुंबईत २ हजार ३०० मेट्रीक टन कचरा घटला, महापालिकेच्या उपाययोजनांना यश.

मुंबई/ संतोष गायकवाड : कचरा ही सर्वच शहराची डोकेदुखी बनलीय. मात्र गेल्या दोन वर्षापासून कचरा कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने राबवलेल्या उपाययोजनांना चांगलच यश आलय. मुंबईतील दररोजचा सरासरी २ हजार ३०० मेट्रीक टन कचरा घटलाय. कचरा संकलनात घट झाल्यामुळे कचरा वाहून नेणा-या तब्बल १२० वाहनांची संख्या कमी झालीय. मुंबईकरांसाठी ही खुशखबर ठरलीय.

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिका अधिका- यांची मासिक आढावा बैठक घेतली त्यावेळी कच-यासह विविध समसयांचा आढावा घेण्यात आला. महापालिका क्षेत्रातून २०१५ मध्ये दररोज सरासरी ९ हजार ५०० मेट्रीक टन एवढा कचरा उचलण्यात येत होता. आता दररोज सरासरी ७ हजार २०० मेट्रीक टनांपर्यंत कचरा उचलला जातोय. २० हजार चौ. मी. पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावरील गृहसंकुल, तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो अशा सोसायट्या वा उपहारगृहे इत्यादींनी त्यांच्या स्तरावर कच-या वर्गीकरण करणे तसेच ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन त्यापासून खत निर्मिती करणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे संगणकीय सादरीकरण केले.

जून २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधी दरम्यान सुमारे ३ हजार ३०० सोसायटी अथवा आस्थापनांपैकी १ हजार सोसायटयांना दिलेल्या नोटिशीनुसार कार्यवाही करीत कचरा प्रक्रिया सुरु केली आहे. तर १ हजार ३२८ सोसायटी / आस्थापनांनी मुदत वाढीसाठी विनंती केली आहे. तर ८४५ सोसायटी / आस्थापनांवर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली असून, यामध्ये १३ ‘एफआयआर’ चा देखील समावेश आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

मे पर्यंत २०० वाहनांची घट अपेक्षित
महापालिका क्षेत्रात संकलित होणारा कचरा वाहून नेण्यासाठी जून २०१७ मध्ये शहर भागात ७८२, पश्चिम उपनगरांमध्ये ९०६ आणि पूर्व उपनगरांमध्ये ५५०; याप्रमाणे एकूण २ हजार २३८ वाहने कचरा वाहून नेत होती. सध्या ही संख्या अनुक्रमे ७३३, ८५८ आणि ५२७; याप्रमाणे एकूण २ हजार ११८ अशी आहे. कचरा संकलनात घट झाल्यामुळे कचरा वाहून नेणा-या वाहनांची संख्या जून २०१७ तुलनेत फेब्रुवारी २०१८ मध्ये १२० वाहनांनी कमी झाली आहे. कच-याचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असल्याने ही संख्या मे २०१८ पर्यंत आणखी ८० वाहनांनी कमी होणे अपेक्षित आहे. यानुसार जून २०१७ च्या तुलनेत मे २०१८ मध्ये वाहनांच्या संख्येत सुमारे २०० वाहनांची घट होणे अपेक्षित आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई तीव्र करा
काही दिवसांपूर्वी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र केल्यानंतर महापालिका क्षेत्रातील अनेक रस्ते अथवा जागा मोकळ्या झाल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी पुन्हा अनधिकृत फेरीवाले दिसू लागल्याच्या तक्रारी सध्या प्राप्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले.

अग्निसुरक्षा तपासणी आता रात्रीही
उपहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे इत्यादी ठिकाणी अग्निसुरक्षा विषयक बाबींची परिपूर्ण अंमलबजावणी होत असल्याची तपासणी नियमितपणे व काटेकोरपणे करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने नोटीस देऊनही त्रुटींची प्रतिपूर्ती झाली नसल्याचे लक्षात आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच अग्निसुरक्षा विषयक तपासणी ही काळाच्या गरजेनुसार रात्री देखील होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन यातील कायदेशीर व तांत्रीक अडचणींचे निराकरण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी उपाययोजना
गेल्या वर्षी पावसाळयात १५५ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला त्याच दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या. यामुळे येत्या पावसाळयात १५५ पैकी ५५ ठिकाणी पाण्याचा अधिक जलदगतीने निचरा होणार आहे. पावसाळयात झाडाची छाटणी करताना काही कंत्राटदार अयोग्य पद्धतीने छाटणी असल्योच निदर्शनास आले आहे. वृक्ष छाटणी करताना ती शास्त्रशुद्ध व वैज्ञानिक पद्धतीनेच योग्य प्रकारे व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!