सुट्टीच्या दिवशीही बीएमसीची ३५७ हॉटेल्सवर कारवाई : ३० ठिकाणी ठोकले सील
मुंबई : शहरातील उपाहारगृहे, हॉटेल्स, बार, मॉल्स यावर सलग दुसऱ्या दिवशीही मुंबई महापालिकेने धडक कारवाई करून ३५७ अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केली. तसेच ३० उपहारगृह व त्याचा काही भाग सील केला. या कारवाईबरोबरच ४२६ सिलिंडरही जप्त करण्यात आले. ‘इ‘ विभागातील शिवदास चापली मार्गावरील हुक्का पार्लरवर कारवाई केली. त्यात तब्बल ६० हुक्का व साहित्य जप्त करण्यात आले. रविवार सुट्टीचा दिवस असतानाही पालिकेने ही धडक कारवाई केली.
कमला मिल्स कंपाऊंडमधील अग्नितांडवात १४ बळी गेल्यानंतर अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी पालिेकेने मोहीम राबवली आहे. शनिवारी महापालिकेने ६२४ ठिकाणी तपासणी केल्यानंतर ३१४ अनधिक़त बांधकाम आढळल्याने त्यावर कारवाई केली होती. तर ७ उपहारगृहे सील केली होती. त्याचप्रमाणे रविवारीही जोरदार मोहीम राबवली होती. २४ विभागासाठी ३ पथक तयार करण्यात आली असून या पथकांनीच ही कारवाई केली. आजच्या कारवाई दरम्यान जेसीबी,बुलडोझर, अतिक्रमण निर्मूलन वाहने, ट्रक आणि गॅस कटर या सारखे साहित्य देखील मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले. सुट्टीच्या दिवशीही महापालिकेचे तिन्ही अतिरिक्त आयुक्त कारवाईस्थळी हजर होते.