बेस्ट कर्मचा-यांची दिवाळी अंधारात ?
बीएमसी कर्मचा-यांना १४ हजार ५०० बोनस
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना १४ हजार ५०० रूपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षी पेक्षा यंदाच्यावर्षी अवघी ५०० रूपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे १६० कोटी ३० लाख रूपये बेाजा पडणार आहे. मात्र बेस्ट कर्मचा-यांच्या बोनसबाबत कोणताही निर्णय न झाल्याने बेस्ट कर्मचा-यांची दिवाळी अंधारात जाणार का ? असाच सवाल उपस्थित होत आहे. आर्थिक तोटयात असलेल्या बेस्ट कर्मचा-यांना वेळेवर वेतनही मिळत नाही त्यातच दिवाळी बोनसचाही निर्णय न झाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे.
मुंबई महापालिकेतील १ लाख १० हजार कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी कर्मचा-यांना १४ हजार रूपये बोनस देण्यात आला होता. मात्र यंदाच्यावर्षी ४० हजार रूपये बोनस मिळावा अशी मागणी कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली हेाती. त्यासाठी ५ ऑक्टोबरला कामगार संघटनांकडून मोर्चाही काढण्यात आला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बोनसच्या प्रश्नावरून प्रशासन विरूध्द कामगार असा संघर्ष सुरू होता. महापालिका कर्मचा-यांना बोनस मिळावा यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी तयारी दर्शविली होती मात्र बंद झालेला जकात कर, जीएसटीची अंमलबजावणी आणि नोटाबंदी आदी कारणांमुळे कर्मचाऱ्यांना गतवर्षीइतका बोनस देणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. महापौर आयुक्त, कामगार संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकाही अनेकवेळा पार पडल्या होत्या. अखेर बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कर्मचा-यांना गतवर्षीपेक्षा ५०० रूपये वाढ देत १४ हजार ५०० रूपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. यशिवाय अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ हजार २५० रूपये, सामाजिक महिला आरोग्य स्वयंसेविका यांना ४ हजार २०० रूपये तर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणसेवक यांना ४ हजार ५०० रूपये अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक यांना २ हजार २५० सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे.