मुंबई : मुंबई महानगर पालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी कालपासून ईडीने धाडसत्र सुरु केले आहे. पालिकेच्या उपायुक्तांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर, पालिकेच्या खरेदी विभाग कार्यालयात धाड टाकली असून तपास सुरू केला आहे.
मुंबईत काल २१ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने जवळपास १५ ठिकाणी धाडी टाकल्या. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर तसेच पालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैसवाल यांच्या घरी देखील ईडीने छापा टाकला. कालच्या धाडसत्रानंतर आजही मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. बिरादार हे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या धाडसत्रावरुन अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तसेच मुंबई महानगर पालिकेच्या भायखळा येथील कार्यालयात ईडीने धाड टाकली. वाढीव दराने औषध खरेदी, मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा आणि बोगस कर्मचारी दाखवून गैरव्यवहार झाल्याची माहिती सुत्रांकडून समजते. त्या अनुषंगाने ईडीकडून चौकशी सुरू आहे. मृतदेहांसाठीच्या बॅग खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची माहिती पुढे येत आहे. ज्या बॉडी बॅग्स मार्केटमध्ये दोन हजारांना मिळत होती. त्या ६ हजार ८०० रुपयांना विकत घेतल्या. ज्या कोविड सेंटर्सला औषधं पोहोचवली होती. ती २५ ते ३० टक्के दराने महानगर पालिकेने विकत घेतल्याचे समजते त्यानुसार ईडीकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणातील तक्रारदार आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या कंपनीला १०० कोटींचे कोविड कॉन्ट्रॅक्ट मिळाले कसे ? जी कंपनी अस्तित्वात नाही त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. पुणे महापालिकेने या कंपनींना ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या वरळीच्या एनएससीआय कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट पण सुजित पाटकरला दिले गेले. उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना कमाईचा हिशोब द्यावाच लागेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.