बीएमसीच्या भरल्या गाड्याला सुपाचं ओझ
कंत्राटी कर्मचारयांची दिवाळी बोनसविना
मुंबई (संतोष गायकवाड) : आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. महापालिकेने यंदा रडत खडत का होईना, कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळाला. सफाई क कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला. मात्र अनेक दिवस पाठपुरावा करूनही क्षय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच गेलीय. ठाणे, केडीएमसी, नवीमुंबई आणि नाशिक या महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. पण बीएमसीकडून दिला जात नाही. सुमारे २६ हजार कोटी एवढं बजेट असणाऱ्या बीएमसीच्या भरल्या गाड्याला मात्र कंत्राटी कामगारांचे ओझे झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा १४ हजार ५०० रुपये बोनस दिला. तर बेस्ट कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रुपये दिवाळी भेट देण्यात आली. मात्र क्षयरोग नियंत्रण विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी दिवाळी बोनस पासून वंचित राहिले आहेत. बीएमसीच्या क्षयरोग नियंत्रण विभागात ४५० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. दरवर्षी प्रमाणे त्यांनीही दिवाळीत बोनस मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. पण नेहमी प्रमाणे प्रशासनाने त्यांना बोनस नाकारला. ठाणे, केडीएमसी, नवीमुंबई, नाशिक या महापालिकेतील क्षयरोग नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस दिला जातो मग बीएमसीतील कर्मचार्यांनाच का नाकारला जातोय असा सवाल कंत्राटी कर्मचारी करीत आहेत.
शिवसेनेला अपयश ?
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रशासन आणि स्थायी समिती सभापती यांच्याकडे दिवाळी बोनससाठी मागणी केली होती. पण कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळवून देण्यात शिवसेनेलाही अपयश आल्याचे दिसून येतंय. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत.
मुंबईला टीबीचा विळखा
मुंबई महापालिका अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभागात १९९९ पासून ३५० कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून जीवघेणा आहे. दर दीड मिनिटाला १ क्षयरोगी मृत्यू होतो तर साधारणपणे दररोज ५ हजार रोग क्षयरोगाने बाधित होतात. मुंबईत क्षयरुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आजमितीला जवळपास ६ हजार एमडीआर टीबी रुग्ण तर अडीच हजार एक्सडीआर टी बी रुग्ण औषधोपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबईला टीबीचा विळखा पडलेला आहे. अश्या अवस्थेत रुगणाची देखभाल उपचार करताना कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची बाधा होते. त्यांना सोयी सुविधा मिळत नसल्याची त्यांची ओरड आहे तसेच तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहेत. त्यामुळे दिवाळी बोनस ही न मिळाल्याने कर्मऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.