मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणूकीत सेनेचा भाजपला पाठिंबा
मुंबई – मुंबईतील कांदिवली येथील वॉर्ड क्रमांक २१ च्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या अचानक निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या १३ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत शैलजा गिरकर यांची सून प्रतिभा गिरकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असून गिरकर यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतलाय. यामुळे प्रतिभा गिरकर यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.
मुंबई महानगरपालिकेत पहारेकरी असलेल्या भाजपकडून अनेकदा शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे यांच्यातील तु-तु-मै-मै अनेकदा पाहायला मिळते. मात्र, असे असतानाही वॉर्ड क्रमांक २१ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे चारकोपमधील वॉर्ड २१ मध्ये येत्या १३ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. शैलजा गिरकर यांच्या जागी त्यांची सून प्रतिभा गिरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणूकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप आमदार भाई गिरकर आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच, गिरकर परिवाराचे आणि शिवसेनेचे जुने संबंध असल्यामुळे गिरकर कुटुंबीयांचा उमेदवार या पोटनिवडणूक असल्यास शिवसेना या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.