भांडूपमध्ये शिवसेना- भाजपमध्ये ” काँटे की टक्कर ”
पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान

मुंबई  ( संतोष गायकवाड )  : भांडुप पश्चिमेतील प्रभाग क्र. ११६ कॉंग्रेस पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर बुधवार ११ ऑक्‍टोंबर २०१७ रोजी पोटनिवडणूक होत आहे. प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील यांनी भाजपकडून तर शिवसेनेतून आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मिनाश्री पाटील निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार आहे.

पोटनिवडणुकीसाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेच्या मिनाश्री पाटील आणि भाजपच्या जागृती पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. काँग्रेसकडून प्रमिला सिंग या निवडणूक लढवित आहेत. बीएमसी निवडणुकीत प्रमिला पाटील यांनी ८३२६ मते मिळवून विजय मिळवला होता, तर मिनाश्री पाटील यांना ७८५७ मते मिळाली हेाती, अवघ्या पाचशे मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला हेाता. त्यामुळे आता सेनेकडून निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्यावेळी भाजपला ३ हजार ५०० मते मिळाली होती. भांडुपमधील हा प्रभाग कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. भांडुप परिसरात पाटील कुटुंबीयांचा दबदबा असल्याने या परिसरात कॉंग्रेसचा झेंडा कायमच फडकत राहिला. मात्र, प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर जागृती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारीही मिळवली. त्यामुळे भाजपसाठी ही पोटनिवडणूक जिंकणे जास्त सोपे असल्याचे मानले जाते. पण  शिवसेनाही या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची होणार असून, दोन्ही पाटील कुटूंबियांसाठीही  प्रतिष्ठेची बनली आहे.

पोटनिवडणूक जिंकणे का महत्वाची
भाजपचे अपक्षांसह ८४ नगरसेवक आहेत; तर शिवसेनेचे अपक्षांसह ८७ नगरसेवक आहेत. शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाले आहे. त्यामुळे शिवसेना – भाजपच्या संख्याबळात फारसा फरक नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे पालिकेतील आकडा वाढविण्यासाठी शिवसेना व भाजपने कंबर कसली आहे,

२९ मतदान केंद्राची व्‍यवस्‍था
पोटनिवडणूकीसाठी २१ हजार ६६८ पुरुष व १६ हजार ४३७ स्त्रिया‍‍ असे एकूण ३८ हजार १०५ मतदार आहेत. महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्र. ११६ मधील सात ठिकाणी २९ मतदान केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त संतोषकुमार धोंडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोटनिवडणूकीची जय्यत तयारी करण्‍यात आली आहे. १२ ऑक्‍टोंबर २०१७ रोजी‘एस’ विभाग कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *