डेंग्यू, लेप्टो, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यू
आजारांची माहिती असणारे बीएमसीचे नवीन ‘ॲप’

मुंबई (प्रतिनिधी) : डेंग्यू, मलेरिया (हिवताप), एच१एन१ (स्वाईन फ्ल्यू), लेप्टोपायरोसिस, चिकुनगुन्या यासारख्या पावसाळी आजारांबाबतची माहिती सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने एक विशेष ॲन्ड्रॉईड ॲप तयार करण्यात आले आहे. ‘Monsoon Related Diseases’ या नावाचे हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या ॲपचे औपचारिक लोकार्पण महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते मंगळवार दि. १९ सप्टेंबर २०१७ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. सीमा बनसोडे – गोखे यांनी दिली आहे.

डेंग्यू, मलेरिया, एच१एन१ (स्वाईन फ्ल्यू), लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुन्या यासारख्या आजारांबाबत इंटरनेटवर माहिती उपलब्ध असू शकते. मात्र, ही माहिती शास्त्रशुद्ध असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या वरिष्ठ डॉक्टरांनी व संबंधित तज्ज्ञांनी या आजारांबाबत शास्त्रशुद्ध माहिती देणारे हे बहुपयोगी ॲन्ड्रॉईड ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये आजाराबद्दलची सविस्तर माहिती, आजाराचा प्रसार कसा होतो व त्याची कारणे काय? प्रसार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी? काय करावे व काय करु नये? इत्यादी माहिती देण्यात आली आहे. पावसाळी आजारांबद्दलची माहिती, आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आजार झाल्यास काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती अॅपमध्ये देण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात महापालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांचे संपर्क क्रमांक / पत्ते देखील देण्यात आले आहेत असेही डॉ बनसोडे -गोखे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!