डोंबिवली, ११ जून : विकास आराखड्यात असलेला आयरे येथील बालाजी गार्डन संकुलात जाणारा रस्ता अनधिकृत बांधकामामुळे रखडला होता. प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता. मनसे आमदार राजू पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण केले. आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या आमदार आणि राज्य सभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचा खासदार निधी वापरून हा रस्ता केला. तो रस्ता आता नागरिकांसाठी खुला झाला आहे.

विकास आराखड्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम येत होते. या बांधकामामुळे रस्ता तयार करण्यात अडथळा येत होता. या कामासाठी पालिकेचे दुर्लक्ष होत होते. वर्षानुवर्ष तेच तेच वकिल महापालिकेच्या पॅनलवर आहेत परंतु कोर्टाकडून आदेश आणण्यासाठी कासवगतीने प्रयत्न चालू होते. याच काळात स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून २० लाखाचा खासदार निधी मिळवला होता. परंतु पालिकेच्या गलथान कारभारामुळे तो निधी सुद्धा परत जाण्याच्या मार्गावर असल्याचे तसेच मंजूर निधीतून सदर रस्ता पुर्ण होणार नाही याची माहिती मनसेच्या महिला सेना जिल्हाध्यक्षा दिपिका पेडणेकर यांनी आमदार राजू पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ता आमदार पाटील यांनी स्वतः २५ लाख आमदार निधी दिला व पालिकेत पाठपुरावा करून अनधिकृत बांधकाम कोर्टातून आदेश आणून निष्कासीत करून घेतले. यामुळे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या बालाजी गार्डन मधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोर्टाच्या कामासाठी बालाजी गार्डनचे रहिवासी चौधरी यांनी वेळेवेळी केलेला पाठपुरावा व कागदपत्र उपयोगी आली आहेत. आमदार राजू पाटील यांनी हे काम हाती घेत पूर्णत्वास नेले आहे. त्यामुळे बालाजी गार्डन मधील नागरिकांनी आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!