मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गति देण्याच्या उद्देशाने रविवार ५ जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त एकाच दिवशी २५ लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती संघटन पर्व प्रभारी आ. रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, नेते पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
चव्हाण म्हणाले की, या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथून करणार आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, नेते, आमदार ही सर्व मंडळी रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचून जास्तीतजास्त नागरिक भाजपाशी जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहेत. या अभियानाबाबत बावनकुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक बूथवरील कार्यकर्ता २५० पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
डिसेंबर पासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ५० हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्य ही ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लागलीच संघटन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर भाजपाचे विविध मोर्चे तसेच प्रकोष्ठ यांनी नोंदणी अभियानासाठी कार्यशाळा ही घेतल्या होत्या. भाजपा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये राज्यभरातून दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना बावनकुळे यांनी दिली होती. या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रीय सहभागासाठी विशेष योजना आखल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणा-या भाजपा च्या या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.