मुंबई : लोकसभा निवडणुकीत ”अब की बार ४०० पार” ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाठक बोलत होते. यासाठीचे बूथ विजय अभियान बुधवार ३ एप्रिल पासून सुरु होणार असून हे अभियान ६ दिवस चालणार आहे, असेही पाठक यांनी सांगितले.
पाठक म्हणाले की, विधानसभा पातळीवर पक्षाच्या बूथ स्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच पन्नास प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य आहे, असेही पाठक यांनी नमूद केले.
घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर, वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपा चा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला अशा समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील, अशी माहितीही श्री.पाठक यांनी दिली. भाजपा शी संबंधीत नसलेल्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य व योजना पोहोचवून भाजपा ला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल तसेच जिथे महायुतीचा उमेदवार असेल तिथे पक्षाची मते महायुती उमेदवारालाच जातील याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.