मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपची एकहाती सत्ता
मुंबई : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाचपैकी ४ राज्यांच्या निवडणुकीत ३ राज्ये जिंकून भाजपने दणदणीत यश मिळवलंय. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपचं कमळं फुललं. तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून काँग्रेसने दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. मिझोराम राज्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.
मिनी लोकसभा असं समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. एक्झिट पोलमध्ये काँग्रेस तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विजय मिळवला. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. भाजपने तीन राज्यात यश मिळवल्याने देशभरात भाजप कार्यकत्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी कार्यकत्यांनी हर हर मोदी, घर घर मोदीच्या घोषणा दिल्या.
राजस्थानची सत्ता बदलाची प्रथा कायम
गेल्या पाच वर्षापासून सत्तेत असलेल्या गेहलोत सरकारचा पराभव करून भाजपने राजस्थानच्या सत्तेची चावी स्वतःकडे घेतली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये सुरू असलेली राजकीय गटबाजी काँग्रेसला काही संपवता आली नाही. त्यात भ्रष्टाचार आणि लाल डायरीचा मुद्दा गाजला. दुसरीकडे भाजपने हिंदुत्वाचं कार्ड खेळलं आणि त्याला यश आल्याचं दिसून आलंय. राजस्थानमध्ये भाजपने ११५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्ता बदलण्याची राजस्थानची प्रथा असून, यंदाही ती कायम राहिली आहे
राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास भाजपची सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. परंतु, भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा पुढे न करता ही निवडणूक लढवली होती. वसुंधरा राजे २००३ पासून राजस्थानमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. मात्र, यावेळी पक्षाने त्यांचा चेहरा पुढे करण्यास टाळले होते. त्यामुळे या निवडणुकीत अनेक चेहऱ्यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यात, वसुंधरा राजे आणि महंत बालकनाथ योगी यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. सोबतच, दिया कुमारी, राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी, गजेंद्र सिंह शेखावत, भूपेंद्र चौधरी, र्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव किंवा सुनील बन्सल यांच्या देखील नावाची चर्चा आहे.
१२ मंत्र्यांचा पराभव
राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या गहलोत मंत्रिमंडळातील 12 बलाढ्य नेत्यांचा पराभव झाला आहे. गहलोत यांच्या १२ मंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला असल्याने काँग्रेससाठी ही विचार करायला लावणारी गोष्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
मध्यप्रदेशात ‘लाडली बेहना’ योजना ठरली भाजपसाठी वरदान
गेल्या २० वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असून त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा होती. त्यासाठी भाजपने आपल्या काही केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचीही ताकत भाजपच्या कामी आली. त्यामुळे या राज्यात पाचव्यांदा भाजपने सत्ता मिळवली आहे. एप्रिल-मे मध्ये शिवराजसिंह यांनी महिला मतदारांना लक्ष्य करणारी ‘लाडली बेहना’ योजना लागू केली. गरीब कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा १ हजार रुपये जमा होऊ लागले. तीन-चार महिन्यांमध्ये योजनेची रक्कम १२५० रुपये करण्यात आली. निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवराजसिंह यांनी ‘लाडली बेहना’ योजनेच्या रकमेत ३ हजारांपर्यंत वाढ करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लाडली योजना भाजपसाठी वरदान ठरल्याची पाहावयास मिळाली.
छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचं चित्र असताना भाजपने या राज्यात जोरदार मुसंडी मारली. भाजपने या राज्यात ५६ जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या वाट्याला ३४ जागा आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपला चेहरा बनवला होता, त्याचा फायदा पक्षाला झाल्याचं दिसून आलं.
तेलंगणामध्ये काँग्रेसची जादू
गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएसचा पराभव करत काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली आहे. केसीआर यांच्या पक्षाला ३९ जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसने या ठिकाणी ६४ जागा पटकावल्या आहेत.
सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानात भाजपाला मिळत असलेल्या यशानंतर ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय आहे असं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मतदारांना धन्यवाद देताना महिला, मुली, बहिणी आणि युवा मतदारांना विशेष धन्यवाद देतो असं ते म्हणाले आहेत.
विचारधारेची लढाई सुरूच राहील : राहुल गांधी
मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो मात्र विचारधारेची लढाई सुरूच राील असं ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणात मिळालेल्या स्पष्ट बहुमताबद्दल तेथील जनतेचे आभार मानले आहेत.
पराभव स्वीकारतो : अशोक गहलोत
राजस्थानचे मावळते मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पराभव स्वीकारला आहे. आम्ही नम्रतापूर्वक हा जनादेश स्वीकारतो असं ट्वीट त्यांनी केलं आहे. आम्ही आमच्या योजना, कायद्यांना लोकांपर्यंत घेऊन जाण्यात पूर्णपणे यशस्वी झालो नाही हे या पराभवातून समजलं असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
–मोदींचा करिष्मा अमित शहांच्या नियोजनामुळे यश : एकनाथ शिंदे
भाजपच्या तीन राज्याच्या विजयाबदद्ल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कौतुकाबरोबरच राहुल गांधींनाही लक्ष्य केलं आहे . “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, देशासाठी केलेलं काम आणि गृहमंत्री अमित शाह यांचं नियोजन यामुळे निवडणुकांमध्ये भाजपा व एनडीएला विजय मिळाला आहे. आत्तापर्यंत लोक म्हणत होते घर घर मोदी. आता या निवडणुकांमध्ये मन मन मोदी असल्याचं सिद्ध करणारा निकाल आपण पाहिला. अनेक लोक म्हणत होते की मोदींचा करिश्मा संपला, निवडणुकीत भाजपा पराभूत होईल. मोठं बदनामीचं षडयंत्र केलं गेलं. पण शेवटी हे निकाल जनतेच्या हातात असतात. जनता जनार्दन हेच सर्वस्वी असतं. या जनतेनं निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मोदी, शहा, नड्डा विजयाचे शिल्पकार : देवेंद्र फडणवीस
छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर पोहचला असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा या विजयाचे शिल्पकार असल्याचे म्हंटले आहे. फ़डणवीस यांनी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले, अमित शाह मास्टर स्ट्रेटेजिक ठरले आणि नड्डांनी पक्षांची योग्य बांधणी करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्याबळावर भाजपला ३ राज्यात चांगले यश मिळाल्याचे विश्लेषण फडणवीस यांनी केले. यावेळी फडणवीसांना काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे पनवती (अपशकुन) होऊन भारत हरल्याची टीका काँग्रेसने केली होती. त्यानंतर सोशल मिडीयामध्ये मोदींना पनवती म्हणून हिणवले जात होते. याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळले असेल. निवडणूक निकालात ते दिसून आले आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.“हा निकाल अनपेक्षित लागला नाही. मी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हा अमित शाहांनी ‘निकाल चांगला लागेल,’ असं सांगितलं होतं. पण, काहीवेळा नको तेवढा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय,” असा टोला अजित पवारांनी काँग्रेसला लगावला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये नागरिकांनी कौल दिला आहे. तेलंगणात रेवंथ रेड्डी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. पण, काही कारणास्तव ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे तेलंगणातील चित्र बदलेले दिसत आहे. के. चंद्रशेखर राव यांनी खूप जाहिरातबाजी केली. पण, लोकांनी त्यांना नाकारलं,” असंही अजित पवारांनी म्हटलं. “आता इंडिया आघाडीतील नेते ईव्हीएमध्ये घोटाळा झाल्याचं बोलायला लागले, तर आश्चर्य वाटायला नको. मग, तेलंगणात वेगळा निकाल कसा काय लागला? जनतेनं मोदी सरकारला पाठिंबा आहे. पंजाबात आपचं सरकार आलं. दिल्लीतही दुसऱ्यांदा आप निवडून आली. त्यांनीही ईव्हीएमध्ये घोटाळा केला का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदीच २०२४ पंतप्रधान बनणार : आठवले
५ राज्यांची विधानसभा निवडणुक ही लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम होती. या ५ राज्यांतील ३ राज्य जिंकुन भाजप प्रणित एन.डी.ए.ने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा प्रधानमंत्री पदी नरेंद्र मोदीच विजयी होणार यावर शिक्कामोर्तब करणारा निकाल आहे. अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे स्वागत केले आहे. या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सर्व नेत्यांचे ना.रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. इं.डि.या .नावाच्या आघाडीने विरोधी पक्षाने खुप ताकद लावुन नरेंद्र मोदी आणि भाजप ; एनडीएला हरविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक हे तोंडघशी पडले आहेत. विरोधकांची इंडिया आघाडी हिचा सपशेल पराभव झालेला आहे असे आठवले म्हणाले.
मोदी-शाहांसोबत तपास यंत्रणांचं देखील अभिनंदन : संजय राऊत
भाजपच्या विजयानंतर त्यांचं अभिनंदन करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तिरकस शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये. “मोदी शाह यांचं अभिनंदन करताना तपास यंत्रणांचं देखील अभिनंदन करायला पाहिजे. कारण विरोधकांच्या प्रचाराला खीळ बसविण्यासाठी तपास यंत्रणांनी इमाने इतबारे धाडी टाकल्या. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी गेली २ महिने अनेक राज्यांत घालवले. त्याचवेळी मतदान सुरू असताना देखील तपास यंत्रणा विरोधकांवर धाडी टाकत होत्या. त्यामुळे मोदी शाह यांच्याबरोबर तपास यंत्रणा देखील अभिनंदनास पात्र आहेत”, अशी टोलेबाजी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
२०१८ ला भाजपचा ३ राज्यात पराभव आता काँग्रेसचा ३ राज्यांत पराभव, लोकसभा नक्की जिंकू : नाना पटोले
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. चार राज्यातील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चारही राज्यात भरपूर मेहनत घेतली होती पण लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो, तो आम्ही नम्रपणे मान्य करतो. या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी करू. विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तिसगडमध्येही विजयी झाला होता व भाजपाचा मात्र पराभव झाला होता ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्याप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल व काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
***
कुणाला किती जागा
राजस्थान – एकूण जागा १९९
भाजप – ११५
काँग्रेस – ७०
इतर – १४
मध्य प्रदेश- एकूण जागा २३०
भाजप – १६५
काँग्रेस – ६४
इतर – १
छत्तीसगड – एकूण जागा ९०
भाजप – ५६
काँग्रेस – ३४
तेलंगणा – एकूण जागा ११९
काँग्रेस – ६४
बीआरएस – ३९
भाजप – ०८
एमआयएम – ०८