पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युतीच्या चर्चा रंगल्या असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर नारा दिला आहे. सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाने तयारी करावी अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना आहे. त्यानुसार संघटना काम करत आहे असेही पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व २८८ जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भारतीय जनता पार्टी सज्ज आहे, असे पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते. तथापि, सरकार पडेल की टिकेल याचा विचार न करता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजपा ठामपणे काम करत आहे.

राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभेच्याही राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविण्याची भाजपाची तयारी आहे असे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील सर्व ९७ हजार बूथमध्ये प्रत्येकी दहा पक्ष कार्यकर्त्यांच्या समित्या नेमण्याचे काम भाजपाने पूर्ण केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून मा. नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस ७ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस राज्यातील बूथ समित्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. त्यावेळी पक्षाचा संघटनात्मक विस्तार सर्वांना जाणवेल. प्रत्येक बूथमध्ये दहाजणांच्या समित्या स्थापन झाल्यावर पक्षाकडून आता प्रत्येकी १८० पर्यंत विस्तार करण्याचे काम सुरू आहे असेही पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!