मुंबई : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपच्या मेधा कुलकर्णी, शिंदे गटातून मिलिंद देवरा यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. भाजपने ७ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

राज्यसभेतून २ एप्रिलपर्यंत निवृत्त होणाऱ्या खासदारांपैकी ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भाजपचे एकूण २८ खासदार यावेळी निवृत्त होत आहेत. भाजपकडून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. अवघ्या महिनाभरात लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे यातील अनेक मंत्रयांना लोकसभेची तयारी करण्यासाठी सांगितले असल्याचे समजते.

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी भाजपकडून उमेदवारी न दिलेल्या सात मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, कनिष्ठ आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, उद्योग मंत्री नारायण राणे आणि कनिष्ठ परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या सर्वाधिक १० जागा रिक्त आहेत. यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये ६-६, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये ५-५, कर्नाटक आणि गुजरातमध्ये ४-४, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये ३-३ १-१ जागा रिक्त आहे.

२०२४ मध्ये राज्यसभेतून ६८ खासदार निवृत्त होणार

२०२४ मध्ये राज्यसभेतून ६८ खासदार निवृत्त होणार आहेत. त्यात ९ केंद्रीय मंत्री आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह ५६ नेते एप्रिलमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *