कल्याण : कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डयांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. एकिकडे सत्ताधारी रस्त्यांसाठी कोटी रूपये येत असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे हे कोटयावधी रूपये जातात कुठे ? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलाय. तर तिसरीकडे डोंबिवलीच्या रस्त्यांसाठीचा ४७२ कोटी रूपयांचा निधी पालकमंत्रयांकडून अडवून ठेवण्यात आला आहे असा सणसणाटी आरोप भाजपचे आमदार रविद्र चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे रस्त्यांच्या समस्येवरून भाजप, मनसेने थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच घेरले आहे.


डोंबिवली भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. डोंबिवलीमधील रस्ते आणि इतर रखडलेले विकास कामे यावर चर्चा केली. तसेच आयुक्तांकडे अनुपालन अहवालाची मागणी केली. तसेच कल्याण डोंबिवलीतील  विविध समस्या व विकास कामांबाबत मनसे नेते, आमदार राजू पाटील यांचीही आयुक्तांसमवेत बैठक पार पडली. सदर बैठकीला मनसेचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हासंघटक हर्षद पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत योजने’ला गती देण्यासंदर्भात  व २७ गावातील पाणी समस्यांकडे आमदारांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. यावेळी आयुक्तांनी सर्वच प्रश्न मार्गी लावण्याचे सांगत, २७ गाव, सागांव, नांदिवली अपुरा पाणी पुरवठा सुरळीत होण्यापर्यंत मोफत टँकर पुरवठा करू असे आश्वासन दिल्याचे आमदार पाटील  सांगितले.

रस्त्याचा ४७२ निधी अडवला : रविंद्र चव्हाण
डोंबिवलीतील रस्त्यांची समस्या गंभीर आहे. मात्र पालकमंत्र्यांकडून डोंबिवलीमधील रस्त्यांसाठी ४७२ कोटी रुपये दिले जात नाही त्यामुळे डोंबिवलीकरांना त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. रस्त्यांसाठी निधी दिला जात नाही यासारखे दुर्भाग्य नाही असाही टोला चव्हाण यांनी लगावला. तसेच महापालिका प्रशासन हेतुपुरस्कार नागरी सुविधाकडे दुर्लक्ष करत आहे. अन्याय करण्याची परिसीमा गाठलीय.  चुकीच्या पध्दतीने कामे सुरू आहेत, नियमांने कामे करण्यासंदर्भात् सांगितले असता त्याकडे कानाडोळा केला जात आहे. कामे किती दिवसात होणार याचा अनुपालन अहवाल द्यावा, ताे ही दिला जात नाही. त्यामुळे  येत्या हिवाळी अधिवेशनात प्रशासन आणि सरकारला धारेवर धरणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितलं. तसेच  याबाबत भाजप आमदार चव्हाण यांनी सांगितले की गेल्या वेळीही अनुपालन अहवालाची मागणी केली होती, मात्र तो देण्यात आला नाही. आजही याबाबत सांगितले अवाहल देणार नाही, टाईमबॉम्बमध्ये कामे पूर्ण करणार नाहीत तो पर्यंत नागरिक सुविधांमध्ये दुर्लक्ष होणार असे आयुक्तांना सांगण्याचा प्रयत्न केला. 

कोटयावधी रूपये जातात कुठे ? : राजू पाटलांचा सवाल

२७ गावात पालिकेने रस्ते केलेले नाहीत, ग्रामपंचायतीच्या काळातील रस्ते आहेत. त्यानंतर  एमएमआरडीएने रस्ते केलेत. निळजे गावातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतीचा १५ कोटी निधी महापालिकेत वर्ग झाला. अशा अनेक गावांचा निधी महापालिकेकडे वर्ग झाला. महापालिकेने अवघे २ कोटीही खर्च केले नाहीत तर नागरिक नाराज आहेत. २७ गावात कामेच झाली नाही. निवडणुका आल्या की यांचे बॅनर लागतात, ११७ कोटी ४३७ कोटी आले ते कोटी गेले कुठे ? असा सवाल आमदार पाटील यांनी शिवसेनेला केला. सध्या ते बॅनरही आता फाटायला आलेत. अजून टेंडर नाही. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत कामे सुरू होतील कि नाही याचीही शंका आहे. असा हल्ला आमदार पाटील यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *