आरक्षण हटवणार नाही, हटवू देणार नाही : अमित शहा
मुंबई : भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी मुंबईत भाजपच्या महामेळाव्यात केलं. शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल गांधी बोलतात असा टोलाही यावेळी शहा यांनी लगावला.
भाजपचा ३८ व्या स्थापन दिनानिमित्त मुंबईच्या बिकेसी मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रमुख पाहुणे शहा बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व कॅबिनेट मधील मंत्री उपस्थित होते. शहा पुढे म्हणाले की,  राहूल बाबा मोदींकडे चार वर्षांचा हिशोब मागतात पण जनता तुमच्याकडे चार पिढ्याचा हिशोब मागतेय. मोदी लाटे मुळेच सर्व एकत्रित आलेत. पक्षाची सुरुवात १० सदस्यांनी झाली होती आत ११ कोटी सदस्य आहेत असे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी संघर्ष केला बलिदान केला असल्याचे शहा म्हणाले. २०१८ ची निवडणूक आश्वासनावर नव्हर तर कामांवर जिकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला
सत्तेसाठी लांडगे एकत्र, पण आमची सिंहाची पार्टी : मुख्यमंत्री 
 शरद पवार- राज ठाकरेंवर केला प्रहार 
मुंबई : शिकार दिसली की सगळे लांडगे कसे एकत्र येतात तसेच सगळे लांडगे सत्तेच्या शिकारीसाठी मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत. पण काळजी करू नका भाजप सिंहाची पार्टी आहे. मोदींसारखा सिंह आमच्याकडे आहे. कितीही लांडगे आले ते सिंहाशी लढू शकणार नाहीत अशी जहरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महामेळाव्यात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेऊन तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता प्रहार केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, पवारसाहेब बोलतात आमच्या काळात एवढे लोक चहा पीत नव्हते. आम्ही जे पितो तेच लोकांना पाजतो, तुमच्या पक्षातले लोक जे पितात ते आम्हाला पाजत येत नाही. पवार साहेब चहावाल्याच्या नादी लागू नका, २०१४ मध्ये चहा वाल्याच्या नादी लागलात तुमची धूळधाण झाली. आता औषधाला उरणार नाहीत असे मुखयमंत्री म्हणाले. कोण बोलतो मी वर्गाचा मॉनिटर आहे. खरंय मी वर्गाचा मॉनिटर आहे. पण माझा वर्ग आमदारांनी भरलाय. मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे. तुमच्या सारख्या रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही. आधे इधर जाओ, आधे इधर जाओ और बाकी नेरे पिछे आओ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर केली. भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.
गडकरींचे राज यांना आव्हान 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिलं. गडकरी नेहमी विकासाच्या गप्पा मारतात, पण केवळ साबणाचे बुडबुडे सोडतात अशी टीका राज यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. त्याला आक्षेप घेत गडकरी यांनी विकासाबाबत शिवाजी पार्कवर जाहीर चर्चेला तयार आहे असे आव्हान राज यांना दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!