ठाणे, दि. १९ (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका निवडणुकीला अवघे तीन महिन्याचा कालावधी असतानाच शिवसेनेने ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी केली आहे मात्र ७०० चौरस फुटांच्या मालमत्ताधारकांचा वचनाचा विसर पडला आहे हा चुनावी जुमला असल्याची टीका भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केलीय

५०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्या सर्व नागरीकांचा मालमत्ता कर माफ, तर ७०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्यांना मालमत्ता करातून अंशत: सवलत, तर ७०० चौरस फुटांवरील घर असलेल्या गृह संकुलांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांट, घनकचरा व्यवस्थापन, सोलार आदी पर्यावरणस्नेही उपक्रम राबविल्यास मालमत्ता करातून सवलत, असे आश्वासन शिवसेनेने वचननाम्यात दिले होते. मात्र, आता केवळ ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव करून ७०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्या नागरीकांना वाऱ्यावर सोडले. वचननाम्यातील या मुद्द्याचा सत्ताधारी शिवसेनेला सोयिस्कर विसर पडला आहे, अशी टीका डुंबरे यांनी केली.

महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी राहिला असताना, शिवसेनेला वचननाम्याची आठवण झाली आहे. भाजपाने सातत्याने पाच वर्ष आठवण दिल्यानंतर, शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी जाहीर केली. त्याचबरोबर आता प्रशस्त रस्ते, पिण्याचे भरपूर पाणी अशा आभासी आश्वासनांची सरबत्ती केली जात आहे. ठाणेकर मतदारांना भुलविण्यासाठी हा `चुनावी जुमला’ तर नव्हे, असा टोला डुंबरे यांनी लगावला आहे.

राज्याचे नगर विकास मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे, महापालिकेच्या ठरावाला मंजुरीची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी मालमत्ता करमाफीच्या ठरावाला महिनाभरातच राज्य सरकारची मंजुरी घ्यावी. अन्यथा, हा `चुनावी जुमला’च असल्याचे सिद्ध होईल, असा टोला डुंबरे यांनी लगावला.


नवीन धरणाच्या वचनाचा विसर

मालमत्ता करमाफी व पाणीपुरवठ्यासाठी नवीन धरणाचे वचन शिवसेनेने २०१७ च्या निवडणुकीत दिले होते. मात्र, त्याचा सत्ताधारी शिवसेनेला विसर पडला होता. या संदर्भात भाजपाकडून सातत्याने आंदोलने व महासभेत विषय उपस्थित केल्यावर अखेर महापालिका निवडणुकीला तीन महिने राहीले असताना मालमत्ता करमाफीचा ठराव मंजूर करण्यात आला. भाजपाच्या दबावामुळेच शिवसेनेला हा निर्णय घेणे भाग पडले, असा दावा भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला.

खड्डयांची समस्या कायमच …..

अवघ्या चार महिन्यांपूर्वी ठाणेकरांनी खड्डेमुक्त रस्त्यांचा अनुभव घेतला होता. काही अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाईचा आभास निर्माण केला. मात्र, अजूनही काही रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. आता घोडबंदर रोडवर जलकुंभाचे उद्घाटन करून, भरपूर पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात या जलकुंभामध्ये पाणी आणणार कोठून हा प्रश्न आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने केवळ धूळफेक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका मनोहर डुंबरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *