भाजप नगरसेवकासह दोघांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
कल्याण – भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील याच्या हत्येची सुपारी दिल्या प्रकरणी अटकेत असलेले भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह त्याचे साथीदार सुजित नलावडे व विजय बाकडे दोघांना शनिवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पेालीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित सात आरोपींना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नगरसेवक पाटील यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी भिवंडी-वाडा परिसरात व्यापाऱयांना लुटणारी टोळी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड केली होती. यावेळी या टोळीने नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी भाजप नगरसेवक महेश पाटील यांनी सुपारी दिल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने महेश पाटील याचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. शुक्रवारी पोलिसांनी नगरसेवक पाटील यांच्यासह दोघांना अटक केली होती.