डोंबिवली : महाविजय – 2024 च्या संपर्क अभियाना संदर्भात भिवंडी लोकसभा मतदारसंघासह कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दिवसभर कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यांचा दौरा आयोजित करण्यात आल्याचे डोंबिवलीचे आमदार तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी कल्याण पश्चिम, मुरबाड आणि शहापूर विधानसभा या तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक घेतील. त्यानंतर कल्याणच्या अहिल्याबाई चौक ते टिळक चौक दरम्यान कल्याणकरांसोबत घर चलो अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ अशा सहाही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार बावनकुळे संवाद साधणार आहेत. डोंबिवलीतील फडके रोड परिसरात डोंबिवलीकरांसोबत घर चलो अभियान, त्यानंतर उल्हासनगर येथेही घर चलो अभियान, असा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रात्री नऊ वाजता लोकसभा कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर बावनकुळे यांच्या दौऱ्याची सांगता होणार असल्याचे ते म्हणाले.