कल्याण : भटके विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी कल्याणात भाजपतर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आले. कल्याणच्या तहसिल कार्यालयावर भाजपच्या भटके विमुक्त आघाडीतर्फे ‘चाबूक मोर्चा’ काढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पोतराज अर्थातच कडकलक्ष्मीकडून आसूड ओढत सरकारचा निषेध करण्यात आला.

राज्य सरकारने गेल्या महिन्यात भटके विमुक्त जमातीच्या शासकीय कर्मचारी – अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातींना आरक्षण देणे असंविधानिक असल्याचे राज्य शासनाने नमूद केल्याचे भाजपतर्फे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या प्रतिज्ञापत्रामुळे भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये संतापाची लाट पसरली असून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी दिली.

एकीकडे राज्य सरकारकडून वर्षानुवर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतं मागितली आणि त्याच समाजाला वंचित करण्याचे काम सरकारने सुरू केल्याचेही आमदार गायकवाड यांनी सांगितले. त्या भटके विमुक्त जाती जमाती समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेऊन त्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी आंदोलकांद्वारे करण्यात आली. या ‘चाबूक मोर्चा’मध्ये सहभागी झालेल्या पोतराज अर्थातच कडकलक्ष्मीकडून आसूड ओढत सरकारचा निषेध करण्यात आला. या मोर्चामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे कल्याण जिल्हाध्यक्ष विष्णू सांगळे यांच्यासह मनोज राय, राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध भाजप पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *