सोलापूर- आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला. आपण यात आपण बचावलो पण आपल्या मोटारीचे नुकसान झाले. महिला आमदारावर हल्ला करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरमधील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या मोटारीवर गुरुवारी रात्री हल्ला झाला. आमदार शिंदे गावभेट दौऱ्यावर असताना पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे त्यांच्या गाडीवर हा हल्ला झाला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपानेच हा हल्ला केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
भाजपाने हल्ला केल्याचा आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला आहे. मराठा समाज आंदोलक आपल्यावरही हल्ले करत असून त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावरदेखील हल्ला केला होता असे सांगितले. प्रणिती शिंदे या आंदोलकांशी नीट ना बोलल्याने ते अधिक आक्रमक झाले. भाजपा असे हल्ले करत नाही, ते आमचे संस्कार नाहीत असेही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की माझ्यावर दहा-पंधरा गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचा डाव आहे. हल्ला नेमका का केला, कोणी केला ? या संदर्भात मी अनभिज्ञ आहे. तरीही मी हल्ल्याचे समर्थन करणार नाही. तर मराठा आरक्षण आंदोलक रामभाऊ गायकवाड यांनी हे कृत्य आपल्या कार्यकर्त्यांनी केल्याची जबाबदारी स्वीकारुन आरक्षणासाठी आपण कोणालाही अडवू असा इशारा दिला.