स्मित हास्य…. एक यादगार सफर !
मराठी व हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या आणि आपल्या विलक्षण अभिनयाने रसिकांच्या मनावर ठसा उमटविणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज ६२ वी जयंती. अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे मंत्री होते तर आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. त्यांचे स्मिता नाव ठेवण्यामागे रंजक कथा आहे. जन्माच्या वेळी त्यांच्या चेह-यावरील हास्य पाहून त्यांची आई विद्याताई यांनी त्यांचे नाव स्मिता असे ठेवले. आणि स्मिता पाटील यांचे हेच स्मित हास्य…मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत एक यादगार बनून राहिली आहे. दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिता पाटील यांचा प्रवास सुरू झाला. तेथे काम करीत असतानाच त्यांची श्याम बेनेगल यांच्याशी ओळख झाली. स्मिता यांची अभिनय क्षमता ओळखून बेनेगल यांनी त्यांना १९७५ मध्ये चरणदास चोर या चित्रपटात भूमिका दिली. स्मिताने वयाच्या २० व्या वर्षी रूपेरी पडदयावर पर्दापण केले, त्यानंतर तिच्या चित्रपटसृष्टीतील आलेख उंचावतच गेला. १९७७ हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. त्यावर्षी `भूमिका` आणि `मंथन` हे दोन चित्रपट यशस्वी झाले. १९८५ ला त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिता यांनी स्त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले, त्यांच्या निधनानंतरही स्मिता यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते. अशा अभिनेत्राीला जयंतीदिनी अभिवादन.