मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुंबई दि.२ एप्रिल : मराठी भाषेत बोला, असं म्हटलं की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहितीय मला त्याची काळजी नाही. इंग्रजी आली पाहिजे, इतर भाषेचा मी द्वेष करत नाही, पण मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे भूमिपूजन आज शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते जवाहर बालभवन चर्नी रोड येथे पार पडल. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,मराठी माणुस म्हटलं की संघर्ष आलाच. भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. त्याचे स्मारक ही येथे जवळच आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही. आपण जे काम करू ते जगातलं सर्वोत्तम काम असावे देशातीलच नाही तर परदेशातील माणसं ही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसं असावे हे त्याला इथं येऊन कळावेमातृभाषेचं मंदिर पहायला जगभरातून लोक यावीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे. महाराष्ट्रात मराठी भाषा शाळेत शिकवावी, दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे. जास्तीत जास्त भाषा शिकणं गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये. मराठी भाषा भवनाला लागून मराठी रंगभूमी दालन उभे राहात आहे. मराठी रंगभूमीला स्वत:चा वैभवशाली इतिहास आहे पारतंत्र्य काय आहे हे आपल्याला बघायला मिळालं नाही हे आपलं नशिब आहे पण इंग्रजांच्या राजवटीत डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहून इंग्रजाच्या डोक्यात मराठीला नेले ते लोकमान्य टिळकांनी असेही ठाकरे म्हणाले.
कर्नाटकात मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार आम्ही चालू देणार नाही, सहन करणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितलं. अटकेपार मराठी भाषेचा झेंडा नेणाऱ्या मराठी राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर त्याला धडा शिकवण्याची ताकत मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत.छत्रपतीच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषा आणि या भाषेचं तेज तळपलं पाहिजे असेही ठाकरे यांनी सांगितलं.