भिवंडीतील खराब रस्त्याची आयआयटी अधिकाऱ्यांकडून होणार तपासणी
भिवंडी : शहरातील अंजूरफाटा ते बागे फिरदोस मशीद या वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्याच्या नुतनीकरणासाठी पालिका प्रशासनाने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 8 कोटी 91 लाखांचा निधी खर्च केला आहे.मात्र तयार केलेला रस्ता मुदतीपुर्वीच खराब झाल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून आयुक्तांनी केलेल्या सूचनेनुसार राज्य शासनाच्या आयआयटी मार्फत रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे आदेश दिल्याने या रस्त्याच्या तपासणीसाठी आयआयटीचे तंत्रज्ञ लवकरच भिवंडीत दाखल होणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.या चौकशीत भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांचे पितळ उघडे पडणार असल्याने मोठी खळबळ माजली आहे.पालिका प्रशासनाने शासनाच्या 14 व्या वित्त आयोग निधितून अंजूरफाटा ते बागेफिरदोस हा 80 फुट रुंद व साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता 8 कोटी 91 लाख रुपये खर्चून तयार करण्याचे काम उल्हासनगर येथील ईगल कंस्ट्रक्शनला दिले होते.मात्र या रस्त्याची रूंदी अनेक ठिकाणी कमी झालेली आढळून आली आहे.तरी देखील ठेकेदारांनी काही ठिकाणी या निधीतून रस्ताच बनविला नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या.तसेच या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने काही ठिकाणी रस्त्यातील डांबर एकाच ठिकाणी गोळा होवून उंचवटे तयार झाले आहेत तर काही ठिकाणी खड्डे झाले आहेत.तसेच मुळ रस्त्यापेक्षा हा रस्ता उंच बनविल्याने त्यावरून रस्त्याबाहेर जाणाऱ्या वाहनांचे खड्यात पडून अपघात होऊ लागले.या बाबत नागरिकांच्या तक्रारी वाढून ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.त्यामुळे आयुक्त डॉ.योगेश म्हसे यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून गोपनीय चौकशी सुरू केली असता त्यांना ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचे आढळून आले आहे.अशा ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याच्या हेतूने आयुक्त म्हसे यांनी आयआयटी मुंबई या शासकीय संस्थेकडून रस्त्याचा अहवाल प्राप्त करण्यासाठी लेखी पत्र पाठविले.दरम्यान पालिकेच्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या खोट्या मोजमापाचा अहवाल सादर करीत शिफारस केली आणि पालिकेच्या लेखा विभागाकडून ठेकेदार ईगल कंस्ट्रक्शन कंपनीला 5 कोटी 40 लाख रुपयांचे बिल अदा केले.मात्र ठेकेदाराने आपल्या कामात कसुर केल्याने आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शासनाच्या आयआयटी मार्फत चौकशीसाठी पत्र देवून ठेकेदाराला आयआयटीला पैसे भरण्यास सांगीतले.मात्र ठेकेदाराने वेळेत ही रक्कम न भरल्याने त्याच्या अनामत रक्कमेतून 16 लाख रूपये पालिकेने शासनाच्या आयआयटी संस्थेमध्ये भरले आहेत.त्यामुळे आयआयटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून शहरात ठेकेदाराने बनविलेल्या अंजूरफाटा ते बागेफिरदोस या रस्त्यावर दररोज किती वाहने धावतात याची मोजणी सुरू केली आहे.तसेच रस्त्यासाठी वापरलेल्या प्रत्येक साहित्याचे नमुने घेवून त्याची तपासणी करणार आहेत.यासाठी आयआयटीचे अधिकारी धरमवीर सिंग हे लवकरच भिवंडीत दाखल होत असल्याने शहरातील सर्व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.