ठाणे, दि.२६ : संविधान दिनाचे औचित्य साधून आज भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या आवारातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी शिंदे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या विचारांनी भारतरत्न ठरले तर त्यांच्या सर्वसमावेशक संविधान निर्मितीमुळे ते विश्व रत्न ठरले. समाजातील सर्व स्थरातील घटकांना समान न्याय देण्याचे काम त्यांनी संविधान निर्मितीद्वारे केले. त्यांचे हे उपकार कधीही विसरता येण्याजोगे नाहीत.
संविधानापुढे सारे समान आहेत हीच शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी सांगितले. बाबासाहेब हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी केलेले काम असामान्य असून त्याचा कधीही विसर पडता कामा नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली त्यामुळे आपण सर्वजण आजही एकत्र आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य आमदार महेश चौगुले, आमदार बाळाराम पाटील,भिवंडी पश्चिमचे आमदार रमेश पाटील, भिवंडी निजामपूरचे उपमहापौर इमरान वली खान, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१०० एमएलडी पाणी योजनेला गती देणार
भिवंडी शहराला भेडसावत असलेला पाणीप्रश्न कायमचा दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या शहराला १०० एमएलडी पाणी देण्याबाबत नगरविकास मंत्री शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली. याशिवाय भिवंडी माजीवाडा रस्त्याचे आठ पदरीकरण, शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी देऊन हे शहर इतर शहरांप्रमाणे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.