भिवंडी : ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५ च्या भिवंडी येथे सुरू असलेल्या कामातील हलगर्जीपणा चव्हाटयावर आला आहे. भिवंडीत मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी लेाखंडी पिलरच्या सळईचा सांगाडा कोसळून ५ कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली, जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मोहम्मद शाहरुख,मोहम्मद मोहबुत,मोहम्मद अब्दुल अहद,मोहम्मद शकील ,मोहम्मद नावेद अशी जखमी कामगारांची नावे आहेत.
ठाणे-भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्प 5 चे काम सुरू आहे. ठाणे ते धामणकर नाका या दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू असताना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा येथील पिलरचे काम सुरू असतानाच लोखंडी सळईंचा सांगडा कोसळून अपघात झाला. विशेष म्हणजे हा लोखंडी सळईंचा सांगाडा रस्त्याच्या मधोमध उभारला जात होता. नजीकचा रस्ता हा वर्दळीचा आहे. सुदैवाने, हा सांगाडा रस्त्याच्यामध्ये कोसळला त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातात 5 कामगार जखमी झाले असून त्यापैकी तीन कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे.