भिवंडी : गेल्या काही दिवसापासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा, आणि रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
भिवंडी शहरातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या कामांचा आढावा भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी घेतला. सर्व प्रभाग अधिकारी, शहर अंभियंता आणि आरोग्य विभागाची बैठक घेऊन युद्ध पातळीवर व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणांची निविदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काढता आल्या नाहीत. आता कमी कालावधीच्या निविदा काढून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
शहरातील महत्त्वाचे मार्ग, चौक आणि अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा. तसेच पावसाने उघडीप दिल्यास महत्त्वाच्या मार्गावर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश त्यांनी दिले. गेल्या काही दिवसांत साथीच्या आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयांतील गर्दीही वाढत असून मुबलक औषधसाठा तयार ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. गरज पडल्यास रुग्ण सेवेसाठी खाटाही वाढविण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. तरीही काही ठिकाणी गरज भासल्यास पुन्हा नालेसफाई करण्यात येईल. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरु नये, यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे. त्यासोबत अग्निशमन दल तसेच वृक्ष प्राधिकरण विभागही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना सुविधा पुरवा
जून महिन्यांत भिवंडी महापालिकेच्या शाळा सुरु झाल्या आहेत. सर्व शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप झाले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा पुरवा. शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे वैद्य यांनी यावेळी सांगितले.