भिवंडीत 782 धोकादायक इमारती, 15 हजार नागरिकांचा जीव टांगणीला : पालकमंत्र्यांचे क्लस्टर योजनेचे तुणतुणे
भिवंडी : भिवंडीतील कोरी बंगाल ही इमारत कोसळून 3 जणांना जीव गमवावा लागल्याने पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय. भिवंडीत सुमारे 782 धोकादायक इमारत असून, 15 हजारपेक्षा अधिक नागरिक या इमारतीमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजना लागू करण्याचे आश्वासन दिले मात्र वर्षभरापूर्वीही त्यांनी आश्वासन दिले होते.
भिवंडीत धोकादायक इमारत कोसळून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्यात. मागील वर्षी विविध ठिकाणी झालेल्या इमारत दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला होता.तर २२ जण जखमी झाले होते.त्यावेळी राज्यशासनाने दखल घेऊन अनधिकृत,धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. पण धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांचा वास्तव्याचा प्रश्न उभा राहत असल्याने ह्या इमारती मोडकळीस आल्या असूनही रहिवाशी जीव धोक्यात घालून राहत आहेत. महापालिका प्रशासन केवळ अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना इमारत खाली करा अशा स्वरूपाच्या नोटिसा बजावून आपले कर्तव्य केल्याचे दाखवतात.मात्र रहिवाशांचे पुनर्वसन करून आपले कर्तव्य का पार पाडत नाही ? असा सवालही नागरिक करीत आहेत.
यंत्रमागनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो.दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पोट भरून उरलेल्या पैशांमध्ये कर्ज अथवा दागिने गहाण ठेवून हक्काच्या निवाऱ्यासाठी घर घेऊन राहतात.त्यामुळे नवीन घर घेणे शक्य नसल्याने जुनेच घर कामगाराला नाईलाजाने घ्यावे लागते. तसेच अनधिकृत इमारतीतील घरे कमी बजेट मध्ये मिळत असल्याने नाईलाजास्तव त्याला त्या घरात राहावे लागत आहे. सरकारने कमी बजेटची घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत अशीही इच्छाअनेक नागरिकांनी व्यक्त केली.
धोकादायक इमारतींची आकडेवारी
भिवंडी -निजामपूर शहर महापालिके अंतर्गत एकूण पाच प्रभाग समित्या आहेत.त्यामध्ये प्रभाग समिती क्र.१ मध्ये ४०, प्रभाग समिती क्र. २ मध्ये १५२, प्रभाग समिती क्र. ३ मध्ये १०१ प्रभाग समिती क्र. ४ मध्ये २७८, प्रभाग समिती क्र.५ मध्ये २११ अशा एकूण ७८२ धोकादायक इमारती आहेत. दरम्यान भिवंडी पालिकेच्या क्षेत्रात सर्वेक्षणात ७८२ धोकादायक इमारती उभ्या असून या इमारतींमध्ये २ हजार ४६० कुटूंब राहतात.
पालकमंत्र्यांच्या क्लस्टर योजनेला मुहूर्त कधी
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारत कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळाची पाहणी केली.नेहमीप्रमाणे लवकरच धोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरापूर्वीही त्यांनी असेच आश्वासन दिले होते.मात्र भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न आजही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पालकमंत्र्याच्या या क्लस्टर योजनेला नेमका कधी मुहूर्त मिळणार आणि आणखी किती बळी गेल्यानंतर या योजनेचा शुभारंभ होईल ? अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहेत.
——
https://youtu.be/XjMxLv1SUiQ