भिवंडीतील मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी बाधित रहिवाशांचा मोर्चा
भिवंडी : कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रोमार्गाला मंजुरी देवून कामाला सुरवात केली आहे.मात्र भिवंडीतील कल्याण नाका (राजीव गांधी चौक) ते टेमघर नाकापर्यंत मेट्रो मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेकडो नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी शुक्रवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढून प्रखर विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,खासदार कपिल पाटील आणि एमएमआरडीए यांच्यात ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीत ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो- ५ या मार्गाला मंजुरी देण्यात आली.एकूण २४ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च ८ हजार ४१६ कोटी रुपये येणार आहे.या बैठकीत मेट्रो ५ सोबतच मेट्रो ६ च्या विस्तारीकरणलाही परवानगी देण्यात आली आहे.यामुळे हे दोन्ही प्रकल्प डीपीआरच्या मान्यतेसाठी कॅबिनेटकडे पाठविण्यात येवून मंजूर करण्यात आली आहे.मेट्रो – ५ मध्ये एकूण १७ स्थानकं असून याच ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रोच्या मार्गावरील भिवंडीतील कल्याण नाका (राजीव गांधी चौक ) ते टेमघर मार्गावरील मेट्रोमुळे शेकडो नागरिक बाधित होत आहे.शासनाने बाधित दुकानदार ,टपरीधारक ,रहिवाश्यांचे प्रथम पुनर्वसन करणे आवश्यक आहे.मात्र बाधित नागरिकांना निव्वळ नोटीसा बजावून संबधित अधिकारी बेघर करण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप कल्याण रोडवरील बाधित नागरिकांनी केला आहे.या मोर्चात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मदन बुवा नाईक ,माजी नगरसेवक दीन मोहम्मद खान ,शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राम लाहारे,समाजसेवक शादाब उस्मानी आदींसह महिला – पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी मोर्चेकऱ्यांनी महापौर जावेद दळवी व पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना निवेदन सादर केले.
Khup chan