भिवंडीत २ हजार लीटर गावठी दारूचा साठा जप्त : दारू माफिया पसार
भिवंडी : भिवंडी तालुका पोलिसांनी वडूनवघरच्या खाडी किनारा लगतच्या जंगलात सोमवारी सायंकाळी छापेमारी करीत तब्बल २ हजार लिटर गावठी दारूचा साठा जप्त करून तो नष्ट केलाय.मात्र या कारवाई वेळी गावठी दारू माफिया अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले आहे. सध्या ठाणे जि.प.आणि पंचायत समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली असून निवडणूक लढविणारे ग्रामीण परिसरातील बहुतांशी उमेदवार आणि राजकीय पुढारी आपल्या समर्थक तळीरामांना खुश करण्यासाठी दारू पाण्यासारखी वाटप करीत असल्याचे प्रत्येक निवडणूकीत उघडपणे दिसून आले आहे.त्यामुळे भिवंडी तालुका पोलीस अधिक सतर्कतेने ग्रामीण परिसरात नजर ठेवून आहेत.याच आधारावर पोलिसांना खबर मिळाली होती कि वडूनवघर गावानजीकच्या खाडीकिनाऱ्याच्या जंगलात दारू माफियांनी मोठी गावठी दारूची हातभट्टी लावून व्यवसाय सुरु केला आहे.त्यानुसार भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले,एपीआय राजीव पाटील,पोशी.केदार रावसाहेब ,जयेश मुकादम ,योगेश शेळकंदे ,भरत शेगर आदींच्या पोलीस पथकाने सायंकाळी वडूनवघर गावात गावठी दारूच्या भल्या मोठ्या हातभट्टीवर छापा मारला.यावेळी दारू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल व साहित्य जप्त करीत तब्बल २ हजार लिटर गावठी दारूचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.तालुका पोलिसांनी या घटनेतील फरार दारू माफियाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला असून दारू माफियाला लवकरच गजाआड करण्यात येईल असा विश्वास एपीआय राजीव पाटील यांनी व्यक्त केला आहे. .