नागरी वस्तीतील डंपिंगमुळे भिवंडीकरांचे आरोग्य धोक्यात : रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात
भिवंडी : शहर महानगरपालिका क्षेत्रातील रोजचा शेकडो टन कचरा चावींद्रा – गायत्रीनगर येथील नागरीवस्तीच्या लगत असलेल्या आरक्षित भुखंडावर टाकला जात असल्याने कचऱ्याच्या दुर्गंधीने विद्यार्थी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या दुर्गंधीने आजारांचे प्रमाण वाढल्याने येथील रहिवाश्यांमध्ये पालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. नागरी वस्तीतील गार्डनसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर कचरा टाकण्याचे बंद न केल्यास पालिकेविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनंता पाटील यांनी दिलाय.
भिवंडी महापालिका क्षेत्रात १० ते १२ लाखांची नागरी वस्ती असून यंत्रमाग कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. दररोज सुमारे ३७० मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याला 1 करोड 4 लाख रुपये खर्च कागदावर दाखवत आहे. त्यामध्ये आरोग्य विभागातील अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी यांचे संगनमत आहे.मात्र पालिका प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे अद्यापी डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटू शकलेला नाही असा आरोप पाटील यांनी केलाय. मागील 6 वर्षांपासून गायत्रीनगर येथे कचरा टाकला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भिवंडी महापालिका प्रशासन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा निर्माण करू शकली नाही.त्यामुळे कचऱ्याच्या डम्पिंगची गंभीर समस्या निर्माण झालीय. गायत्रीनगर परिसरात झोपडपट्टीमध्ये सुमारे २५ हजार रहिवाशी राहत असून जवळच पालिकेच्या शाळांमधून ८५० विद्यार्थी शिकत आहेत.या कच-याची दुर्गंधी व जळण्यात येणा-या कचऱ्याच्या धुरामुळे येथील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. खोकला ,दमा ,टीबी , मलेरिया ,चिकनगुनिया आदी जीवघेणे आजार जडले आहेत.कचरा वाहून नेणारे ट्रक उघड्यानेच कचरा वाहून नेत असल्याने रस्त्यावर घाण पडते त्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होतो. महत्वाची बाब म्हणजे या डम्पिंग मधील कचऱ्यातील केमिकल युक्त पाणी शेतात जात असल्याने 4 वर्षांपासून येथील शेती करणे बंद केले आहे याकडेही पाटील यांनी लक्ष वेधलय.