पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कारासाठी
पंडिता माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा

मुंबई : राज्यसरकारच्यावतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी केली.
राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पं. केशव गिंडे, पं. नाथराव नेरळकर, श्रीमती कमलताई भोंडे या मान्यवरांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांची शिफारस केली होती. यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं. राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

पंडिता माणिक भिडे यांचा परिचय

पंडिता माणिक गोविंद भिडे. (जयपूर – अत्रोली घराणे) यांचा १९३५ साली कोल्हापूर येथे जन्म झाला. बालवयापासून संगीताची आवड असलेल्या माणिकताईंना आई-वडीलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले. जयपूर अत्रोली घराण्याचे आद्यपुरुष उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र उस्ताद मजी खाँ व भूर्जी खाँ साहेब यांची तालीम लाभलेले मधुकरराव सडोलीकर हे माणिकताईंना गुरु म्हणून लाभले. गोविंद भिडे यांच्याशी विवाह होऊन माणिकताई मुंबईस वास्तव्यात आल्या. या काळात सुमारे १५ वर्षे गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्यत्व माणिकताईंनी पत्करुन गानसाधनेतला कळस गाठला. माणिकताई आकाशवाणीच्या मान्यता प्राप्त कलाकार असून देश व विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या गाण्यांच्या सीडीज बाजारात उपलब्ध आहेत. संगीताची परंपरा जोपासणे हे कर्तव्य माणून माणिकताईंनी अनेक शिष्य घडविले त्यातील अश्विनी भिडे-देशपांडे या त्यांच्या कन्या. त्याचबरोबर माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गितिका वर्दे या व अनेक शिष्यांना घडविले.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!