महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद ; रेल रोको, रास्ता रोको आणि तोडफोडीच्या घटना
मुंबई : भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याने मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आंबेडकरी जनतेने रस्त्यात उतरून आंदोलने केली. यावेळी रेल रोको, रास्ता रोको, बसेस व वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले याचा परिणाम वाहतूक सेवेवर झाला. अखेर दुपारी साडेचार नंतर बंद मागे घेण्यात आलाय. भारीप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनीच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची घोषणा केली. या बंदमध्ये भारीप बहुजन महासंघ, डावी लोकशाही आघाडी आणि इतर समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. आजच्या महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यात महाराष्ट्रातली 50 टक्के जनता सहभागी झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. भीमा कोरेगावमधील हिंसेप्रकरणी शिवराज प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना सरकारने अटक करावी. जो न्याय याकुब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘सकाळपासूनच मुंबईसह राज्यातील विविध भागातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली होती. मुंबईतील घाटकोपर, चेंबूर, विक्रोळी, मुलुंड, भांडूप, वरळी गोवंडी, मानखुर्द, पवई अशा भागांमध्ये बेस्ट बसेस, खासगी वाहने, मोटर सायकलींची देखील तोडफोड करण्यात आली. चेंबूर येथील सायन पनवेल महामार्गावर ठियया आंदोलन करीत वाहने रोखल्याने वाहतूक केांडी झाली होती. या भागांमध्ये बेस्ट बसेस, खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांच्या टायरमधील हवा काढण्यात आली. दहिसर टोल नाक्यावर वाहनं रोखून धरणाऱ्या आंदोलकांनी आता टोल नाकाही बंद पाडला. कलानगर जंक्शन आणि सांताक्रूझच्या वाकोला भागात आंदोलकांनी रास्ता रोको केला तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अडवूर धरला उर्से टोलनाका येथे आंदोलक रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील मल्टिप्लेक्समधले आणि सिंगल स्क्रिन थिएटरमधल्या चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले होते. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शांततेत बंद पार पडला. पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, नालासोपारा, मनोर, जव्हार आदी परिसरात काही किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागसह पेण, श्रीवर्धन, नागोठणे, माणगाव, महाड, पोलादपूर या शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. घोडबंदर रोड येथे पहाटे अज्ञात व्यक्तीने ब्रह्मांड सिग्नल दरम्यान टायर जाळून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्वरीत आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली. अनेक शाळा-महाविद्यालये शाळा प्रशासनाने स्वत:हून बंद ठेवल्या.
मेट्रोसह तीन्ही मार्गावरील रेल्वेवर आंदोलन
मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे या रेल्वे रूळावर उतरून आंदोलनकांनी लोकल अडवून धरल्या. दादर, एलफिन्स्टन, विक्रोळी, घाटकोपर, ठाणे, कांजूरमार्ग, नाहूर, मुलुंड, डोंबिली, कल्याण, दहिसर, गोरेगाव, कांदिवली, विरार, चेंबूर, गोवंडी, स्थानकात आंदोलकांनी निदर्शने केली त्यामुळे तिन्ही रेल्वे सेवांना फटका बसला. तिन्ही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प होती. तर त्यानंतर गाड्या काही मिनिटे उशिराने धावत होत्या. घाटकोपर ते विमानतळादरम्यानची मेट्रो सेवाही थांबविली होती. आंदोलनामुळे एसी लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. सायंकाळी महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
९० बसेसची तोडफोड; ४ चालक जखमी
महाराष्ट्र बंदच्या काळात विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीत ९० बसेसची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या असून, यामध्ये ४ बस चालक काचा लागून जखमी झाले आहेत. आज दिवसभरात एकूण ३ हजार ३७० बसेस पैकी ३ हजार २०८ बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५२ बसेसची तोडफोड करण्यात आली. यामध्ये ४ बसचालक काचा लागून जखमी झाले आहेत. आसारजी विश्वनाथ गरजे (डेपो- प्रतीक्षा नगर, ठिकाण – जिजामाता नगर, बसमार्ग १७२), अरुण गणपत मिरगळ , ( डेपो – मध्य मुंबई, ठिकाण- वरळी नाका , बसमार्ग १५४), नितिन कमलाकर वाघमारे ( डेपो – मजास, ठिकाण- पवई, बसमार्ग – ४९६ ), शशिकांत गणपत गोसावी , ( डेपो -सांताक्रुझ बसमार्ग-मोतीलाल नगर- २२९ ) अशी त्यांची नावे आहेत.
विद्यार्थ्याचा मृत्यू : पोलीसही जखमी
हिमायतनगरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शीघ्र कृती दलाचे एक वाहन हदगावहून आष्टीमार्गे हिमायतनगरकडे जात असताना जमावाने जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनातील जवानांनी उतरून लाठीमार सुरू केला. यात योगेश प्रल्हाद जाधव या दहावीत शिकणा-या मुलाच्या मानेवर फटका बसला. नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यास हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर वाळकीफाटा येथे दगडफेकीत कारमधून प्रवास करणारी चिमुकली जखमी झाली. शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत आंदोलकांनी पोलीस वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, जमादार गणेश कानगुले, चालक शिवाजी मुंडे हे जखमी झाले. यापैकी गोविंद मुंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंबिवली, कांजूरमार्ग स्टेशनमध्ये तोडफोड
मुंबईत कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात आंदोलकांनी खुर्च्या, लाइट आणि पिण्याच्या पाण्याचे मशिनची तोडफोड केली. तसेच डोंबिवली स्थानकात तिकीट खिडीकीच्या काच्या फोडून नुकसान करण्यात आले.
विद्यापीठाची पूर्नपरिक्षा
मुंबई विद्यापीठाच्या विधी सह इतर काही विद्याशाखांच्या परिक्षा होत्या. या परीक्षेसाठी जे विद्यार्थी वेळेवर पोचू शकले नाही. त्यांची पुनर्परीक्षा घेणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली. भीमा कोरेगावला झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज बंद पुकारण्यात आला होता. बस सेवा ठप्प झाली होती. तसंच मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी वेळेवर परीक्षेला पोचू शकले नाहीत. काही विद्यार्थी वेळेत पोचले होते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचता आले नाही त्यांची पुनर्परीक्षा घेणार असल्यााची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे. तर याचवेळी पुणे आणि औरंगाबाद विद्यापीठाने मात्र आपल्या परीक्षा पुढे ढकलली असल्याचं आधीच जाहीर केलं आहे.